वणी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय पुढील 2 दिवसांसाठी बंद

अतिवृष्टिमुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश, मनसेच्या मागणीला यश

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सर्व शासकीय, निम शासकीय शाळा व महाविद्यालय पुढील 2 दिवस म्हणजे 15 जुलै ते 16 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिति तसेच पुढील दोन तीन दिवस संभाव्य पावसामुळे विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश लागू केले आहे.
 
वणी तालुक्यात मागील 7 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे. वणी शहर व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात. तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढ्यावर असलेल्या रहदारी पुलावरून पाणी प्रवाह सुरु आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये दि. 15 जुलै ते 16 जुलै या 48 तासांसाठी शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

राजू उंबरकर यांनी मानले जिल्हाधिकारी यांचे आभार 

तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती पाहता पावसाचा प्रकोप कमी होई पर्यन्त वणी विभागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. मनसेची मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी वणी तालुक्यातील सर्व शाळाना दोन दिवस सुट्टी जाहीर केल्यामुळे मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.

Comments are closed.