बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून घरोघरी श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक श्री गणेश उत्सव साजरा करण्या संदर्भातल्या सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आल्या. याच मार्गदर्शक सूचना सर्वसामान्यापर्यंत तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वणी नगर परिषद अधिनस्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र 8 मध्ये नवोपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्वनिर्मित श्री गणरायाचे शिल्प तयार करण्याकरता प्रोत्साहित केले आणि विद्यार्थ्यांना घरच्या घरी गणरायाची मूर्ती बनवण्यास आवाहन दिले.
सदर आव्हान विद्यार्थ्यांनी सक्षमतेने पूर्ण केले व पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी अप्रतिम व सुंदर श्री गणरायाचे शिल्प तयार करून शाळेमध्ये दिनांक 9 सप्टेंबर रोजी सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक म्हणून सदर बाब ही कार्यानुभव विषयातील प्रात्यक्षिकामध्ये गृहीत धरून त्याचे गुणांकन विद्यार्थ्यांना करण्याबाबत मुख्याध्यापकांनी सर्व वर्ग शिक्षकांना सुचित केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गशिक्षक कु नीलिमा राऊत, कु. किरण जगताप, कु. सुनीता जकाते, श्री देवेंद्र खरवडे, श्री अविनाश तुंबडे तसेच शिक्षक स्वयंसेविका कु. बोरवार यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेचा नित्य उपक्रम म्हणून स्मायली देण्यात आली व सर्वांचे कौतुक करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात पर्यावरण पूरक विशेष करून मातीच्या मुर्त्यांचा वापर करण्या संदर्भात सूचना देऊन पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व याद्वारे पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येक सण समारंभात पर्यावरणाचा निश्चितच विचार करून पर्यावरण पूरक सन समारंभ साजरे करनार असा निश्चय केला.
Comments are closed.