वणीतील करिअर शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद, 1100 विद्यार्थी सहभागी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना केले. सोमवारी दिनांक 8 मे रोजी वणीतील शासकीय आयटीआय येथे छ. शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील सुमारे 1100 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. कार्यक्रमात रोजगार व करिअर विषयावर प्रा. राहुल पळवेकर, प्रा. राम पंचभाई, संहिता गाणार व निकेश जिलठे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. जी यू राजूरकर होते. तर आमदार संजीवरेड्डी बोदुकरवार यांची उद्घाटक तर एसडीओ नितीन कुमार हिंगोले व डॉ. भालचंद्र चोपणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. स. 11 वाजता दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करीअर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीत 40 फ्लेक्समधून वेगवेगळे अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, शैक्षणिक कर्ज, उद्योग कर्ज, वसतीगृह सुविधा इत्यादींविषयी माहिती देण्यात आली होती.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जी यू राजूरकर यांनी भविष्यात किमान कौशल्यावर आधारित असे आणखी उपक्रम राबवले जाईल अशी ग्वाही दिली. तर नितीन कुमार हिंगोले यांनी असे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. भालचंद्र चोपणे यांनी कोणतेही क्षेत्र लहान किंवा मोठे नसून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअर निवडावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

सदर शिबिर दोन सत्रात घेण्यात आले. पहिल्या सत्रात प्रा. राहुल पळवेकर यांनी जागतिक कौशल्याच्या वाटा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर बोलताना त्यांनी इंडस्ट्री 4.0 ला वृद्धींगत करण्यासाठी कौशल्यात भर घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित नवीन वाटा निवडाव्यात असे आवाहन केले. प्रा. राम पंचभाई यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून उदाहरणाद्वारे व्यक्तीमत्व विकासाचे विविध पैलू उलगडून सांगितले.

दुस-या सत्रात संहिता गाणार यांनी उद्योजक्ता या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी व्यवसाय, उद्योग, गृहउद्योग, लघुउद्योग इत्यादींची माहिती देत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. निकेश जिलठे यांनी जाहिरात या विषयावर बोलताना ब्रँड प्रोमोशन, ब्रँड इमेज, पोझिशनिंग इत्यादी संज्ञा स्पष्ट करून व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रात असलेले जाहिरातीचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय तेलतुमडे यांनी केले. पहिल्या सत्राचे संचालन अर्चना डोंगरे यांनी केले. तर विद्या शितोळे, स. आयुक्त कौशल्य विकास व रोजगार विभाग यवतमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. दुस-या सत्राचे संचालन उप प्राचार्य भारत कंदोई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे गटनिदेशन, निदेशक, कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.