शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय करावा: खा. अहीर
आमदारांना कार्यक्रमात डुलकी, तर किशोर तिवारींचा सरकारला घरचा आहेर
वणी/ विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून आता शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाची जोड दयावी. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. वणीतील एसबी हॉल या ठिकाणी झालेल्या शेतकरी मार्गदर्शन व परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
सोमवारी दुपारी 2 वाजता वणीतील एसबी हॉल येथे कृषी विभागाद्वारे ‘शेतकरी मार्गदर्शन व परिसंवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, तर विशेष अतिथी म्हणून किशोर तिवारी, श्यामजी जयस्वाल, जलज शर्मा उपस्थित होते. खा हंसराज अहीर आपल्या भाषणात म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता परंपरागत शेतीला फाटा द्यायला हवा. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळी पालन, मधमाशी पालन, रेशीम उद्योग याची कास धरावी. आता शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे. शेतक-यांजवळ रब्बी व खरीप संपल्यानंतर चार ते पाच महिन्यांचा कालावधी मिळतो. त्याच्यासोबत शेतीसाठी लागणारे साहित्यही काही कामाचे नसते. अशावेळी पूरक व्यवसाय त्यांना चांगले उत्पन्न देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊ शकेल.
खा. हंसराज अहिर पुढे म्हणाले की भाजप सरकारने सिंचन व्यवस्था, मुद्रा लोन व्यवस्था करून ठेवली आहे. जर यात कोणत्याही अडचणी येत असल्यास त्याची सोडवणूक लवकरच आमच्या कडून केल्या जाणार अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगार करावा. उत्पन्नाला भाव मिळत नाही असे म्हणता त्यापेक्षा उत्पन्न वाढवा. असेही ते म्हणाले.
किशोर तिवारींनी काढली सरकारची पिसं
कार्यक्रमाला शेतकरी नेते किशोर तिवारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सध्या ते सरकारच्या शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष आहे. कार्यक्रमात आपले मत व्यक्त करताना त्यांनी चक्क सरकारलाच धारेवर धरलं. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडताना ते म्हणाले की फेब्रुवारी महिन्यापासून तुरीचे चुकारे अजूनही मिळाले नाही. तर 70 टक्के तूर अजूनही सरकारने खरेदी केली गेली नाही. आहे त्या उत्पन्नला भाव मिळत नाही मग उत्पन्न वाढवून काय करायचे. असं म्हणून त्यांनी सरकारला घरचा आहेर दिली.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजेह गायनार यांनी केले. तर सूत्रसंचालन युवराज जंगले यांनी केले. उपस्थितांचे आभार पं.स. उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी मानले.
खासदार अहिर यांच्या भाषणाच्या वेळी आमदारांना डुलकी
कार्यक्रमात खासदार हंसराज अहिर यांचे भाषण सुरू असताना वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना स्टेजवरच डुलकी आली. भरगच्च कार्यक्रम व पुरेसा आराम न मिळाल्याने त्यांना असे झाले असावे. मात्र आमदांना चक्क देशाचे देशाचे मंत्री बोलत असताना डुलकी आल्याने कार्यक्रमस्थळी याची चांगलीच चर्चा दिसून आली.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…