सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: जर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर योग्य पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आमटे यांनी तिथे निलगोंड्याला जाऊन इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तळमळ निर्माण करण्यासाठी कष्ट केलेत. त्या भागातलं वातावरण इतकं अविश्वासाचं आहे की, त्या अविश्वासाच्या वातावरणात लोकांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं, हीच सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.
त्याच्यात अनिकेत आमटे, समीक्षा आमटे यशस्वी झालेत. असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी काढलेत. स्थानिक जैताई मंदिरातीलल चैत्र नवरात्रौत्सव साजरा झाला. यात पू. मामा क्षीरसागर ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक सोहळा झाला. यात अनिकेत आमटे, समीक्षा आमटे यांना प्राचार्य राम शेवाळकर स्मृती शिक्षणव्रती पुरस्काराने आमटे दांपत्य गावंडे यांच्या हस्ते सन्मानित झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. विद्यमान आमदार संजय देरकर, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, बांधकाम व्यावसायिक तथा साहित्यिक आशुतोष शेवाळकर, सत्कारमूर्ती अनिकेत व समीक्षा आमटे, जैताई देवस्थानाचे अध्यक्ष माधव सरपटवार, विजय चोरडिया, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशीष खुलसंगे, प्रामुख्याने उपस्थित होते. या नंतर लगेच श्री जैताई अन्नछत्र समितीचे मुन्ना पोद्दार, मुलचंद जोशी, किशोर साठे, चंद्रकांत अणे, नामदेव पारखी, तुषार नगरवाला यांनी आमटे दांपत्याचं स्वागत केलं.
गावंडे पुढे म्हणालेत की, हेमलकसाची जी शाळा आहे, त्या शाळेतून अनेक डॉक्टर झालेत. वकील झालेत. इंजिनिअर्स झालेत. ते आता वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत आहेत. नीलगोंडाच्या शाळेच्या माध्यमातून एवढं मोठं काम उभं राहणं हे खरं समाजसेवेचं वर्तुळ पूर्ण करणारं आहे. असं वर्तुळ पूर्ण करायला खूप वेळ लागतो. खूप मेहनत लागते.अशा लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे.
मराठी माणूसाचा उद्योग किंवा अन्य कुठलाही वारसा तिसऱ्या पिढीपर्यंत सहसा टिकत नाही. नंतर ते घराणं संपतं, असा आपला इतिहास आहे. समाजसेवेच्या क्षेत्रातली अशी बरीच घराणी आहेत. जी तिसऱ्या पिढीनंतर टिकली नाहीत. पण आमटे कुटुंब याला अपवाद निघाला. या पिढीने हा वारसा तेवढ्याच ताकदीनं चालवला.
कठीण स्थितीतून सामोर जात स्वतःच नाव मोठं करणे हे आणखी कठीण असतं. अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे दोघांनी हे सिद्ध करून दाखवलंय. संपूर्ण भारत देशाचं तीर्थक्षेत्र हेमलकसा आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी येथे दोन प्रवाह सातत्याने गेल्या 50 वर्षापासून आहेत. त्यामध्ये हिंसेच्या प्रभावाची चर्चा जास्त होते.
त्या प्रवाहापासून बरोबर स्वतःला वेगळं राखत, मोजून मापून पावलं टाकत, आपल्या सेवेचं क्षेत्र समृद्ध करणं ही आणखी कठीण गोष्ट आहे. ती अनिकेत आणि समीक्षा यांनी सिद्ध करून दाखवलं. विपरित अशा नैसर्गिक वातावरणात राहून आमटे परिवार अद्भूत सेवाकार्य करीत आहेत. अनिकेत आणि समीक्षा दोघेजण तिथे थांबून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि अन्य बाबींवरही कार्य करतात. ते स्वतः जातात आणि मुलांना शिकवतात.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यमान आमदार संजय देरकर यांनी हेमलकसा या गावाच्या जुन्या आठवणींना उजाला दिला. पंधरा-वीस वर्षांपूर्वी ते काही कामानिमित्त गाडी घेऊन गेले होते. देरकर म्हणालेत की, त्या परिसरात इतकी दहशत होती की, जाताना घाबरत गेलो. ज्यावेळेस समोर गेलो, त्यावेळेस मागच्या गाडीला बॉम्बस्फोटनं उडवलं.अशा परिसरात आमटे परिवार जोमानं कार्य करीत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे.
हे कुटुंब जगाच्या पाठीवरचं एक आगळं वेगळं कुटुंब आहे. जे स्वतःची चिंता न करता इतरांसाठी झटतं. आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेसाठी निरंतर काम करतच असतात. बाबा आमटे यांचं कार्य ही पिढी पुढं नेत आहे. आम्हीसुद्धा आध्यात्मिक जीवनात काम करतो. वडिलांचा वारसा आहे. त्या पद्धतीनेच काम या ठिकाणी सुरू आहे. आमटे परिवाराचं जे कार्य आहे, ते अध्यात्मिकपेक्षाही वरचं काम आहे. तेवढं या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगावसं वाटतं. जैताई मातेच्या कृपेने विविध कार्यक्रम या ठिकाणी नेहमी आयोजित करतात. ज्यांचा गुणगौरव खरंच करायला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जैताई देवस्थानाच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. देवस्थान धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविते याची त्यांनी दखल घेतली. आमटे परिवाराचं आदिवासी क्षेत्रात असलेलं कार्य हे गौरवास्पद आहे. या क्षेत्रात काम करताना त्यांना अनेक आव्हाहनांना तोंड द्यावं लागतं. दिवंगत बाबा आमटे यांचा वारसा अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांनी समर्थपणे पुढं नेला आहे. सर्वांनी त्यांच्या या कार्यात यथायोग्य सहकार्य केलं पाहिजे. या दांपत्यांचा सत्कार म्हणजे वणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.
सत्कारानंतर आपल्या भावना अनिकेत आमटे यांनी व्यक्त केल्यात. ते म्हणालेत की, आम्ही आदिवासी करतो. त्यातून आम्हाला समाधान मिळतं. आम्हाला त्याच्यातून शांती मिळते. जो रिझल्ट दिसतो, तो रिझल्ट खूप चांगला आहे. तो आपल्याला प्रेरणा देतो. मुलं शाळेत शिकून डॉक्टर होतात. इंजिनिअर होतात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळायला जातात. पुरस्कार प्राप्त करतात. या गोष्टी आपल्याला काम करायला अजून स्फूर्ती देतात.
तशाच प्रकारे असे पुरस्कार आपल्याला मिळतात. आपल्या प्रकल्पाला मिळतात. किंवा आम्हाला मिळतात. तेपण आम्हाला स्फूर्ती देत असतात. की, आपण अजून चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आपली जबाबदारी वाढते. अजून चांगल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे असं वाटत असतं. अनेक मोठी माणसं बाबांमुळे जोडली गेलीत. त्यांचा आम्हाला सहवास लाभला. या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात मोठी अडचण भाषेची येते. त्यांना त्यांच्या माडिया भाषेशिवाय कोणतीच भाषा येत नाही. मात्र आम्ही त्यावर उपाय शोधला. आज आमचे विद्यार्थी यशांची शिखरे गाठत आहेत.
सत्कारमूर्ती समीक्षा आमटे यांनी याप्रसंगी प्राचार्य राम शेवाळकर स्मृती शिक्षणव्रती पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्यात की, या 16 वर्षामध्ये इतरांना किती शिकवलं इतकं नक्की माहिती नाही. मात्र या काळात मला खूप शिकायला मिळालं. माझं आयुष्य खूप समृद्ध झालं अनुभवांनी. समृद्ध झालं माणसांनी. समृद्ध झालं मैत्रिणींनी. मी खरंच भाग्यवान समजते स्वतःला की, मला हे सगळं आयुष्य जवळून बघता आलं. मुलांना खूप शिकवलं. म्हणजे मी खूप चांगल्या वयोगटासोबत काम करते.
असं वाटतं की, शाळेतली मुलं आपल्याला कायम तरुण ठेवतात. आपल्याला नवीन जगाची ओळख करून देतात. अनेक प्रसंग कायम लक्षात राहतात. शेवटी आयुष्य म्हणजे काय असतं? अशाच गोष्टी असतात की, जे आपण एकमेकांना सांगू शकतो. शेअर करू शकतो. अनेक मुलांची आयुष्यं मी खूप जवळून बघितलेली आहेत. अजून एक अस्सल असा अनुभव आला म्हणजे की, आदिवासींचं जे जगणं आहे ते निसर्गाशी खूप जवळीक साधतं. त्यांच्यासोबत आम्ही जंगलामध्ये फिरायला जातो. कुठे ट्रेकिंगला जातो. त्यांच्या घरामध्ये काही काम करताना, शेतामध्ये काम करताना, त्यांच्या कौटुंबिक काही प्रॉब्लेम आहेत. त्याच्याशी डील करताना हे सगळं आहे ते जवळून अनुभवलंय. जे अनुभव मला मिळालेले आहेत ते अतुलनीय आहेत.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसह माधव सरपटवार यांनी आमटे दांपत्याच्या विशेषत: समीक्षा ह्यांच्या कार्याचं कौतुक केलं. ते म्हणालेत की, आमटे परिवाराच्या डोळ्यांसमोर हे चित्र लहानपणापासून आहे. मात्र मोठ्या शहरातून एका जंगली भागात काम करणं हे समीक्षा यांच्यापुढं एक मोठं आव्हान होतं. तरीदेखील त्यांनी अनिकेचे हात बळकट करण्याकरिता निरंतर साथ देत आहे.
कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. आभार प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी मानले. पाहुण्यांच्या आगमन प्रसंगी बाबा आमटे यांच्या ‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई’ हे प्रेरणागीत डॉ. अमृता अलोणे आणि डॉ. ऐश्वर्या अलोणे यांनी गायलं. हा शिक्षणक्षेत्रासाठीचा पुरस्कार असल्याने गदिमांच्या ‘कुंभारासारखा गुरु नाही रे जगात’ हेगीतअपर्णा देशपांडे, अरुणा उत्तरवार, अर्चना उपाध्ये, सारिका पुरवार यांनी गायलं. बा. भ. बोरकर यांच्या ‘तेथे कर माझे जुळती’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हे गीत अपर्णा देशपांडे आणि अरुणा उत्तरवार यांनी सादर केलं. वणीतील ज्येष्ठ नाट्यकलावंत अशोक सोनटक्के यांनी माडिया गोड इसमाची भूमिका याप्रसंगी साकारली, हे विशेष. आयोजनाची जबाबदारी तुषार नगरवाला, सागर मुने, जयंत लिडबिडे आणि समितीच्या सदस्यांनी सांभाळली.
Comments are closed.