आज अनिकेत व समीक्षा आमटे यांना प्रा. राम शेवाळकर स्मृती ‘शिक्षणव्रती’ पुरस्कार
श्री जैताई चैत्र नवरात्रौत्सवात ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते होईल प्रदान
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: श्री जैताई देवस्थानात वासंतिक चैत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. यात दररोज विविध कार्यक्रम होत आहेत. पू. मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी होणारा कार्यक्रम शनिवार दिनांक 5 एप्रिला सायंकाळी 7.00 वाजता होणार आहे. या विशेष स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमात लोकबिरादरी प्रकल्प, हेमालकसाचे अनिकेत आणि समीक्षा आमटे यांना प्राचार्य राम शेवाळकर स्मृती ‘शिक्षणव्रती’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जैताई मंदिराच्या प्रांगणात लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते आमटे दाम्पत्य हा पुरस्कार स्वीकारतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार आहेत. संपादक देवेंद्र गाोवंडे, आमदार संजय देरकर, श्री जैताई देवस्थानाचे अध्यक्ष माधव उपाख्य बाळासाहेब सरपटवार, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा साहित्यिक आशुतोष शेवाळकर,सेवानिवृत्त ग्रंथपाल किशोर साठे, प्रा. चंद्रकांत अणे, तुषार नगरवाला, प्रशांत माधमशेट्टीवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
अनिकेत आणि समीक्षा या आमटे दांपत्याचा त्यांच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागातील अबोल व अजोड शैक्षणिक कार्याबद्दल गौरव होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 11,000 रूपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने माधव सरपटवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
Comments are closed.