शिंदोल्याची फास्ट बॉलर शगुफ्ता सय्यद विदर्भ क्रिकेट संघात

विजयवाडा येथे सुरू असलेल्या BCCI च्या अंडर 23 वन डे तुर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व

विलास ताजने, वणी: भव्य स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी दृढ इच्छाशक्तीच्या बळावर प्रचंड कष्ट उपसायची मनाची तयारी असेल तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते. असचं काहीसं यशाचं शिखर शिंदोला येथील शगुफ्ता सय्यद हिने सर केलं आहे. वणी तालुक्यातील शिंदोला येथील शगुफ्ता हसनोद्दीन सय्यद या 20 वर्षीय युवतीची नुकतीच विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे. शगुफा ही राईट हँड मिडियम फास्ट बॉलर आहे. 26 जानेवारीपासून विजयवाडा (कर्नाटक) येथे सुरु बीसीसीआय द्वारा आयोजित वन डे क्रिकेट स्पर्धेत ती विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

शगुफ्ता ही एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातून आलेली आहे. शगुफ्ताचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण आदर्श हायस्कूल, शिंदोला येथे झाले. शगुफ्ताला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. शाळेत शिकताना क्रिकेट हा तिचा आवडता खेळ. घरी शगुफ्ताचा भाऊ फिरोज हा देखील क्रिकेट खेळत होता. आपल्या बहिणीतील खेळाचे कौशल्य ओळखून त्याने तिला प्रोत्साहन दिले.

दहावी नंतर शगुफ्ताने वणीतील लोटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळी तिने वणीतील 11 स्टार ही क्रिकेट अकाडमी जॉईन केली. तिथे तिने दोन वर्ष कोचिंग घेतले. तिथून तिच्या खेळाला बहर आला. क्रिकेट कोच संतोष चिल्कावार व नदीम शेख यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेटमध्ये करिअर करता येऊ शकते याची खात्री झाल्याने तिने पुढील शिक्षणासाठी नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. तिने नागपूर येथे आंबेडकर महाविद्यालयात बीए साठी प्रवेश घेतला तर क्रिकेट कोचिंगसाठी नागपुरातील साई अकाडमी जॉईन केली.

आणखी मोठा पल्ला गाठायचाये – शगुफ्ता
आज मी विदर्भाच्या टिमचे प्रतिनिधित्व करीत असले तरी भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे पुढील ध्येय आहे. आज जे यश गाठले ते केवळ माझे कुटुंबीयांच्या सपोर्टमुळेच आहे. यश तेव्हाच मिळते जेव्हा अपयशानंतरही आपण सकारात्मक विचार घेऊन प्रयत्न करीत राहतो.

शगुफ्ताची आई गृहिणी तर वडील सिमेंट कंपनीत नोकरीत आहे. भाऊ फिरोज हा कृषी कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो. तो देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. तर मोठी बहीण रोशनी ही वाडी (कर्नाटक) येथील सिमेंट कंपनीत नोकरीला आहे.

ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ फिरोज, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मदान, मंगेश करडे, नदीम शेख, विनोद निमकर, सचिन पांडे, राजू डवरे, अनिरुध्द पाथ्रडकर, दीपा कुरील, संतोष चिल्कावार आदींना देते. तिच्या यशाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.

Comments are closed.