अबब… शिरपूर शिंदोला रस्त्यावर प्रतिदिन 2700 वाहनाची दळणवळण

जितेंद्र कोठारी, वणी : चारगाव, शिरपूर, शिंदोला ते कलमणा पर्यंत 47 कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याची ओव्हरलोड व जड वाहतुकीमुळे काही महिन्यातच दुरावस्था झाली आहे. शिंदोला ते चारगाव पर्यंत डांबरी रस्ता व पुलावरील जोडरस्ता अनेक ठिकाणी दबला आहे. या मार्गावर कोळसा, सिमेंट, व गिट्टी भरलेले ओव्हरलोड ट्रकसह दर रोज सरासरी 2 हजार 700 ट्रक आवागमन करीत असल्याचे कंत्राटदाराने केलेल्या सर्व्हेतून समोर आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाणीतून दररोज 40 हजार टन कोळसाची ट्रकद्वारे वणी व इतर ठिकाणी वाहतूक केली जाते. मुंगोली ते वणी रस्त्यावरील पुल तुटल्यामुळे ही सर्व वाहतूक शिवणी, कोलगाव ते शिंदोला, शिरपूर मार्गे वळविण्यात आली आहे. शिवाय घुग्गुस येथून ही शेकडो ट्रक कोळसा या मार्गाने वाहतूक केली जाते. 45 ते 60 टन ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या या हायवा ट्रकमुळे नव्याने तयार झालेल्या 13 किलोमिटर डांबरी रस्त्याची पुरती वाट लागली आहे. आबई फाटा ते चारगाव पर्यंत तर ओव्हरलोड वाहनाच्या संख्येत आणखी भर पडत आहे. 

केंद्रीय रस्ता विकास निधी अंतर्गत चारगाव, शिरपूर, शिंदोला, कलमणा ते चंद्रपूर जिल्हा सीमा (वनोजा) पर्यंत 16.800 की.मी. सिमेंट व डांबरी रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. पुणे येथील मे. आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर रस्त्याचे बांधकाम केले.

कंपनीने सतत 5 दिवस शिरपूर, आबई फाटा व शिंदोला या तीन ठिकाणी 24 तास कर्मचारी नेमून या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनाची नोंदी घेतली असता 24 तासात सरासरी 3 हजार वाहन या रस्त्यावरून धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात 2700 वाहन कोळसा, सिमेंट, गिट्टी व इतर खनिज वाहतूक करणारे आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची भारवहन क्षमता 22 हजार टन प्रति दिवस आहे. परंतु सद्य स्थितीत या मार्गावरून तब्बल 1.50 लाख टन वजनाची वाहतूक दररोज होत आहे. तब्बल 5 पटीने जास्त भार वाहतुकीमुळे 47 कोटीच्या निधीतून बांधण्यात आलेला हा रस्ता पहिल्या पाऊस काळातच अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे कोळसा, सिमेंट वाहतूक करणाऱ्या 3 एक्सल हायवा ट्रक चालक वाहन चालवताना फक्त 2 एक्सलवरच ट्रक चालवताना निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिरिक्त भार पडून रस्ता क्षतिग्रस्त झाला आहे.

पहा व्हिडिओ –

Comments are closed.