“शब्द दिला तर माघार नाही” : उपमुख्यमंत्री शिंदे यांची वणीत गर्जना

वणीच्या शासकीय मैदानात जनसागर उसळला

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता वणीच्या शासकीय मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा उत्साहात पार पडली. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेच्या सुरुवातीला शिंदे यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली तसेच संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी ठामपणे सांगितले, “शब्द दिला तर माघार घेणार नाही” आणि वणीतील पाणी, रस्ते व प्रदूषणाच्या समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

वणी हे महिला सबलीकरणाचे शक्तिपीठ असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, नगराध्यक्ष पदासाठी तुमची लाडकी बहीणच उभी आहे. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही देत विधानसभेत जसा चमत्कार महिलांनी दाखवला तसाच पुन्हा दाखवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोळशाच्या खाणींमुळे शहरातून सतत ट्रक जात असल्याने रस्त्यांची चाळण झाली असून ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार वाढले आहेत. यावर उपाय म्हणून बायपास रस्ता मंजूर करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच नगर परिषदेच्या निधीचा अपहार झाल्यास चौकशी करून भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सभेदरम्यान त्यांनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून कोल डेपो व रेल्वे सायडिंगवरील प्रदूषणाबाबत तातडीची माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी 24 तासांत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सभेत जाहीर केले. सभेला पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, नगरसेवक पदाचे 29 उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम, हरिहर लिंगमवार, विनोद मोहितकर, मनीष सुरावार, सुधाकर गोरे, किरण नांदेकर, सचिन पोहेकर, शिवराज पेचे, विक्रांत चचडा यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

पालकमंत्री संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला की, “नगरविकास खातं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अखत्यारीत असल्याने वणी नगर परिषदेवर भगवा फडकल्यास निधी कमी पडणार नाही.” पायल तोडसाम यांनीही आपले मनोगत सभेसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चोरडिया यांनी केले. शासकीय मैदानात महिलांची बहुसंख्य उपस्थिती जाणवत होती. ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता आणि संपूर्ण मैदानात जनसागर उसळल्याचे चित्र निर्माण झाले.

Comments are closed.