‘ए अजनबी तू भी कभी’ ही आर्त हाक पोहचली पहिल्याच नंबरवर आणि…
न.प. व न.पं. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वणीकरांचा जलवा
बहुगुणी डेस्क, वणी: ‘तू कल चला जायेगा, तो मैं क्या करूंगा’ नाम या चित्रपटातलं दर्दभरं गीत सुरू होतं. रसिकही सुरांमध्ये आकंठ बुडाले होते. पाहतापाहता ही आर्त हाक प्रथम क्रमांकावर पोहोचली. हे युगलगीत गात होते दिगंबर ठाकरे आणि देवेंद्र खरवडे. हे दोघेही वणीतील नगरपरिषदेच्या अनुक्रमे सात आणि आठ क्रमांकाच्या शाळांतील शिक्षक.
नुकताच बुलडाणा येथे नगर प्रशासन संचालनालय, नवी मुंबई व नगरपरिषद प्रशासन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी एक उपक्रम राबविला. त्यात नगरपरिषद व नगरपंचायतींमधील अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव झाला. यात या दोन शिक्षकांनी यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व केले.
विभागीय स्तरावर अशाप्रकारे पहिल्यांदाच कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एकेरी गायनात दिल से चित्रपटातील ‘ए अजनबी तु भी कभी’ या गीतासाठी नगरपरिषद शाळा क्रमांक 7 चे शिक्षक दिगंबर ठाकरे यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. वणी नगरपरिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांनी सादर केलेल्या नाटिकेलासुद्धा या प्रसंगी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
याआधी जिल्हास्तरावर झालेल्या एकेरी व युगलगीतासाठी या दोघांनीही व नाटीकेने प्रथम पारितोषिके पटकाविली होती. विभागातही अशाच प्रकारची कामगिरी केल्यामुळे वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे व उपमुख्य अधिकारी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांनी या दोघांवर कौतुकांचा वर्षाव केला.
बक्षिस वितरणप्रसंगी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील, विभागीय सह-आयुक्त गीता वंजारी, जिल्हा सह-आयुक्त पेट्टे, विठ्ठल केदारे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विभागीय स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून नगरपरिषद शिक्षकांचे कौतुक होत आहे.
Comments are closed.