सरकारी दवाखान्या समोरील रस्त्यावर पाण्याचे तळे, रुग्णांची होतेय गैरसोय

जितेंद्र कोठारी, वणी : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय समोर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. रुग्णालयाकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची तसेच नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. अशी मागणी येथील समाजिक संस्था स्माईल फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे. स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

पाऊसकाळ सुरु होताच ताप, सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. वणी शहर तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयाच्या प्रवेशद्वार समोरच पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना पाण्यातून वाट काढून रुग्णालयात जावं लागत असते. या मार्गावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थांनासुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारी दवाखाना समोरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी स्माईल फाऊंडेशन तर्फे करण्यात आली आहे.

Comments are closed.