युवा होतकरू शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

शेतात काम करीत असताना विषारी सापाचा चावा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका युवा शेतक-याला शेतात काम करीत असताना विषारी सापाने दंश केला. आज शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास येनाडी शेतशिवारात ही घटना घडली. रवींद्र सुधाकर राहुलवार (39) असे मृत शेतक-याचे नाव आहे. रवींद्रला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात सातत्याने सर्पदंशाच्या घटना घडत असताना परिसरातील रुग्णालयात मात्र स्नेक अँटीवेनिन लसच उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे.

रवींद्र हा येनाडी येथील रहिवासी होता. यांच्याकडे वडिलोपार्जित 6 एकर शेती होती. त्यांचा भाऊ हा चंद्रपूर येथे वेकोलित कर्मचारी आहे. तर रवींद्र हा आपल्या कुटुंबीयांसोबत येनाडी येथे राहत होता. त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते. रवींद्र हा आज शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेला. शेतात काम करीत असताना सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्याला विषारी सापाने दंश केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दंश होताच रवींद्र याने फोन करून याची माहिती आपल्या गावातील एका मित्राला दिली. त्याचा मित्र काही सहका-यांना घेऊन शेतात पोहचला. शेतात रवींद्र हा जमिनीवर पडला होता. लोकांनी त्याला उचलून तातडीने घुग्गुस येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरने रवींद्रला चंद्रपूर येथे रेफर केले. मात्र रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

रवींद्रच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवींद्र याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.