बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं ‘भजं’

कृषि उत्पन्न बाजार समितीत चहा व भजे विक्री

0

जब्बार चीनी, वणी:  प्रशासन वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी शेकडो लोक एकत्र येतात. मात्र इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.  घराबाहेर  पडताना  मास्क किंवा रुमाल, दुपट्टा बांधून निघण्याची सूचना असतानाही बाजार समितीच्या आवारात मात्र लोक बिनदिक्कत विना मास्क लाऊन फिरतानाचे चित्र दिसत आहे. याशिवाय आवारात सकाळी चहा, भजी व समोशांची विक्री केली जात आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून थोक भाजीबाजार आल्याने सकाळी 7 ते 11 इथे चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे हे क्षेत्र कोरोनाविषयी संवेदनशील म्हणावं  लागेल. त्यामुळे या परिसरासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र त्याचा कोणताही फरक दिसून येत नाही.

चहा  नाष्टा सुरू, सॅनेटाईज मशिन बंद

बाजार समितीत येणा-या लोकांची संख्या लक्षात घेता इथे सॅनिटाईज फायर मशिन लावण्यात आली आहे. त्या मशिनमधून आधी जाणा-या व्यक्तीला सॅनेटाईज केले जाते. मात्र ही मशिनच बंद झाली आहे. यासह लोकांना बाहेर निघाल्यावर चहा नाष्टा हवा असतो त्यामुळे तिथे चहा व नाश्ता विकणे सुरू आहे. समितीच्या बाहेरच्या कॅन्टीन मध्येही चहा व सिगारेट विकल्या जात आहे. महत्वाचे म्हणजे या कॅन्टीनवर नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सुद्धा चहा घ्यायला येतात.

शासकीय अधिकारी, पोलिस प्रशासन हे जनतेला घरातच थांबा अशा सूचना देत आहेत. तसेच रस्ते बंद आहेत, स्पिकरद्वारे दररोज आवाहन केले जात आहे. शासन चोहोबाजूंनी जनतेची काळजी घेत आहे, घराबाहेर पडू नका असे आवाहन करीत आहे. मात्र जनतेकडून काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन पाळले जात नाही.

शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दुकानदार व ग्राहक यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु मला काही होत नाही, अशी भूमिका काही नागरिकांची दिसून येत आहे. घराबाहेर पडल्यानंतर दुकानामध्ये खरेदी करताना नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.