वणीत ‘अधिकृतरित्या’ विनाकारण फिरणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ

समाजसेवेच्या नावाखाली मुक्त संचार करणा-यांचा सुळसुळाट

0

बहुगुणी डेस्क, वणी:  संचारबंदीत सामाजिक कार्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना दिला जात आहे. त्यामुळे सामाजिक कार्याचा दाखला देऊन परवाना मागणा-यांची संख्या वाढली आहे. ज्या कार्यासाठी दोन ते तीन लोक पुरेसे आहे, अशा कामासाठी 20 ते 25 लोकांचे संचार परवाने मागितले जात आहे. शिवाय 20-25 मास्क वाटण्यासाठीही अनेक जण मुक्त संचार करीत फिरत आहे. परिणामी वणीत ‘अधिकृतरित्या’ विनाकारण फिरणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे संचारबंदीचाही फज्जा उडत आहे.

सध्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवसाय आणि कामं बंद झाले आहेत. त्यामुळे गरीब आणि मजूर वर्गावर बेरोजगार होण्याची वेळ आली. शिवाय वणीमध्ये सध्या अनेक परराज्यातील लोक अडकलेले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे काही सेवाभावी लोक, संस्था त्यांना अन्नधान्य वाटप करण्याचं काम करत आहे.

असे कार्य करणा-या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून प्रशासन त्यांना संचार परनावा देते. हा परवाना महसूल विभागाद्वारे दिला जातो. मात्र हा परवाना मिळाला तर बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी मिळते असा समज करून काही चमको लोक त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास 10 पॉकेट जरी वाटायचे असेल तर त्यासाठी 8-8 लोकांचा परवाना मागणे सुरू आहे. तर जिथे 5-6 लोकांची गरज आहे तिथे 25-25 लोकांचा संचार परवाना मागणे सुरू आहे.

समाजसेवेच्या नावाखाली चमकोगिरी
काही लोक, संस्था व संघटना इमाने इतबारे कार्य करीत आहे. या लोकांकडून अन्नधान्य, जेवणाचे पाकिट इ. चे वाटप सुरू आहे. त्यातील अनेक लोक तर शासनाने दिलेल्या गाईडलाईनचे काटेकोरपणे पालन करीत आहे. मात्र काही लोकांनी समाजसेवेच्या नावाखाली अक्षरशः चमकोगिरी लावली आहे. छोटासा बिस्किट पुडा, मास्क देतानाही अगदी खांद्याला खांदा लावून फोटो काढणा-या महाभागांची संख्याही वणीत विलक्षण वाढली आहे. अशा चमको लोकांपासून इतरांनाही धोका उत्पन्न होऊ शकतो.

अवैध कार्यासाठीही होऊ शकतो परवान्याचा उपयोग

सध्या सामाजिक कार्यासाठी प्रशासन संचार परवाना देत आहे. या पासचा गैरफायदा अवैैध कार्यासाठीही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनेक अवैध धंदे बंद असल्याने हा पास अवैध धंंदे सुरू ठेवण्यासाठीचे एक साधनही बनू शकते. त्यामुळे प्रशासनाने केवळ आवश्यक असणा-या लोकांनाच संचार परवाना देणे गरजेचे झाले आहे. तसेच ज्यांना परवाना दिला आहे ते खरेच त्याचा योग्य तो वापर करीत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे ही गरजेचे आहे.

सध्या संचारबंदी आणि जमावबंदी सुरू आहे. त्यामुळे लोकांकडून त्याचे पालन होणे गरजेचे आहे. प्रशासन अनावश्यक बाहेर न निघण्याचे आवाहन करीत आहे मात्र यातून पळवाटा काढत काही लोक याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे असे प्रकार थांबणे गरजेचे आहे. तरच जमावबंदी आणि संचारबंदीला काही अर्थ उरेल ज्या कार्यासाठी संचारबंदी व जमावबंदी ठेवण्यात आली आहे ते यशस्वीही होणार नाही

Leave A Reply

Your email address will not be published.