तालुका प्रतिनिधी, वणी: गांधी मरत नाही. मात्र कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी नथुराम जगत नाही. असे विचार चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यान मालेला दि. 30 शनिवारी संध्याकाळी 7 वाजता बाजोरिया लॉन येथे प्रारंभ झाला. पहिल स्मृतिपुष्प परमानंद रामचंद्र कापसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होतं. गांधी का मरत नाही ? या विषयावर ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, ठाणेदार वैभव जाधव, अंबादास वागदरकर, प्रा. रेखा बडोदेकर, डॉ. भालचंद्र आवारी यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, की गांधीवर जगाने प्रेम केले. मात्र मूठभर लोकांनी गांधीचा पराकोटीचा तिरस्कार केला. बालपणी माझ्या मनात गांधी बद्दल आदराच स्थान होत. परंतु मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत गांधींचा तिरस्कार व्हायचा. गांधींचा वध केला असा उल्लेख केला जातो. वध हा दृष्ट प्रवृत्तीच्या माणसांचा होतो. मग गांधी दृष्ट होता का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या देशाच्या सर्वोच्च पदी भंग्याची मुलगी असणं ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. असं गांधी म्हणायचे, गांधींनी अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न केला. म्हणून गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. मजबुरी का नाम महात्मा गांधी. असं म्हटलं की, लोक हसतात गांधींची मजबुरी कुठे होती ? नेल्सन मंडेलांची असेल, मात्र गांधींची कुठेच मजबुरी नव्हती.
आजही देशाचे पंतप्रधान बाहेर देशात गेले की, महात्मा गांधींचे नाव घेतात. मग गांधींची मजबुरी कशी ? महात्मा गांधी हे सामर्थ्याचे नाव आहे. एका गालावर मारलं की, दुसरा गाल समोर करावा असं गांधींनी म्हटलंच नाही. मात्र गांधींनी आयुष्यभर अन्यायाचा प्रतिकार करण्याची शिकवण दिली. साध्य आणि साधन याला महत्त्व दिलं. नथुरामनी आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी गांधींची हत्या केली. जगाचा द्वेष करत असताना आपल्याला प्रेम पाहिजे असेल तर गांधी मरत नाही. गांधींची हत्या का झाली? हे समजून घेतल्यास गांधी का मरत नाही? हे समजून येतं.
गांधींचा अभ्यास करण्याची आज वेळ आली आहे. असेही ते म्हणाले.
God is truth ऐवजी Truth is God हे गांधींनी सिद्ध केले. त्यांनी भाषणात भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, तुकाराम महाराज, गाडगेबाबा यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. ते शेवटी म्हणाले, प्रेक्षकांना सिनेमातील नायक जोपर्यंत मरावं असं वाटत नाही. तोपर्यंत गांधी मरत नाही ?
पहिल्या स्मृतीपुष्पाचे प्रास्तविक प्रा. करमसिंग राजपूत यांनी केले. डॉ. रमेश सपाट यांनी स्वागतपर विचार व्यक्त केले. पाहुण्यांना पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.भालचंद्र चोपणे यांनी अध्यक्षीय भाषण केले. विलास शेरकी यांनी संचालन केले. कार्यक्रमाला बहुसंख्य वणीकरांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा: