विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुलाच्या कठड्याला गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

बहुगुणी डेस्क, मारेगाव: बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाच्या कठड्याला दोरीने गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोकुळ राजू धुळे (20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बुरांडा (ख.) येथे राहत होता. तो मारेगाव येथे आयटीआयच्या प्रथम वर्षाला शिकत होता. त्याचे वडील मिस्त्री काम करतात.

शनिवारी रात्रीच्या सुमारास तो घरी कुणाला न सांगताच घरून निघून गेला होता. रात्री उशिरा पर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी रात्री त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठे ही आढळला नाही. रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास काही शेतकरी शेतात जात असताना पुलाच्या कठड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक जण आढळला. शेतक-यांनी ही माहिती मारेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर मृतकाची ओळख पटून ही घटना उघडकीस आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. गोकुळने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. घटनेचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.

Comments are closed.