विद्यार्थ्यांचे मोहदा-वेळाबाई मार्गावर ठिय्या आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: मोहदा-वेळाबाई मार्गावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. या मार्गावर असलेला पूल जीर्ण झाला असून या पुलावर सध्या चिखलाचे साम्राज्य आहे. जीर्ण पूल असल्याने या मार्गावरून बस जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढून शाळेत जावे लागते. या होणा-या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिनांक 13 जुलै रोजी दुपारी हे आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कृष्णानपूर व मोहदा येथे 7 वी पर्यत जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेळाबाई या गावाला जावे लागते. मोहदा ते वेळाबाई या मार्गावर एक लहान पूल आहे. नेहमीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल काही ठिकाणी तुटलेला आहे. शिवाय पावसाळा असल्याने पुलावर चिखल जमा झाले आहे. गावात येणारी महामंडळाची बससेवा ही काही काळापासून बंद आहे.

सध्या कृष्णानपूर व मोहदा येथील विद्यार्थी हे सायकल, मोटारसायकल, ऑटो किंवा पायीच शाळेत जातात. मात्र सध्या पावसाळ्यामुळे या पुलावर चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात गावकरीही सहभागी झाले. अखेर सोमवारपासून पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

पाऊस आला धावून, मटेरिअल गेले वाहून
आंदोलनानंतर या पुलाच्या कामाला सुरूवात झाली. या पुलावरील खड्यात व चिखल असलेल्या जागेत भर टाकण्यात आला. मात्र गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस आल्याने हे साहित्य वाहून गेल्याची माहिती आहे.  

हे देखील वाचा: 

प्रेमनगर परिसरात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

Comments are closed.