जीवनाचे खोदकाम…..

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: दहा बारा सायकली… त्यावर जाड दोर गुंडाळलेले….. एक कुऱ्हाड, खोदकामाचं काही साहित्य… असं सगळं काही घेऊन ‘‘जीवनाचा’’ शोध घेणारे हे कामगार. नागपूरला पाण्यासाठी विहिरीचा वापर अनेक घरी होतो.उन्हाळ्यात हे कामगार सर्वत्र फिरताना दिसतात.

आपल्या बापजाद्यांपासून विहिरी उपसणे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय. सकाळपासूनच ही टीम कामाच्या शोधात निघते. शहराच्या गल्यागल्यांतून आवाज देत हे काम शोधत असतात. सकाळपासूनच कामाला सुरूवात होते. दोन दोन लोकांच्या बॅचेस तयार केल्या जातात. एक टीम थकली की ती वर येते. दुसरी टीम लगेच त्यांना जॉईन करते. जीव जाळणाऱ्या नागपूरच्या उन्हात हे आपले आयुष्य जाळत असतात.

नागपूरच्या मानेवाडा परिसरात टिनांच्या, पत्रांच्या, प्लास्टिकच्या छतांचा आधार घेत यांचं जगणं. पिढीजात हाच व्यवसाय. सरकारी शाळांमध्ये यांची लेकरं शिकतात. जिथपर्यंत त्यांना शिकवणं जमलं, तिथपर्यंतच. मग तेही याच कामाला लागतात. जवळपास हे 400 लोक आहेत. विहीर उपसायला मिळाली की पोटातून उपसेलली भूक यांना बुजविता येते.

विहीर खोदणारे कामगार

शिक्षण, आरोग्य, वीज वगैरे यांच्यासाठी काल्पनिक गोष्टीच आहेत. मुलांना शिकवावसं वाटतं त्यांना; पण पैसाही नसतो आणि जागृतताही नसते. पाण्याला जीवन म्हणतात. हे आयुष्याची माती उपसत इतरांना ‘‘जीवन’’ देतात. मात्र यांचे आयुष्य हे मातीसारखेच. आयुष्याचा गाळ उपसता उपसता काळ लोटतो. रोजचा दिवस एखाद्या थराप्रमाणे पुन्हा पुन्हा साचतच जातो. हा गाळ रोजच उपसायचा आयुष्याचा. आयुष्याच्या तळाशी जेवढं पाणी ओंजळीत धरता येईल तेवढं धरायचं. तहान भागवायची. पुन्हा वाऱ्याने फडफडणाऱ्या प्लास्टिक, टिनांच्या छपराखाली धडधडणाऱ्या आयुष्याला उद्याच्या भाकरीसाठी विसावा देत, नव्या पहाटेची प्रतीक्षा करायची…. एवढंच असतं जीवन. आयुष्याची कितीही माती खोदली तरी, ‘‘जीवन’’ हवं तसं हाती लागत नाही…….

सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.