विवेक तोटेवार, वणी: शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच धुमाकुळ घातला होता. रस्त्यावरून जाणा-या 10 पेक्षा अधिक लोकांना त्याने चावा घेतला होता. अखेर आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास या कुत्र्यास ठार करण्यात आले. दरम्यान दीपक टॉकीज परिसरातही एक असाच पिसाळलेला कुत्रा फिरत असल्याने या परिसरात दहशत पसरली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात एक पिसाळलेला कु्त्रा फिरत होता. या कुत्र्याने अनेकांवर हल्ला करत त्यांना चावा घेतला होता. पिसाळलेला कुत्रा चावा घेत फिरतोय याची माहिती वा-यासारखी पसरल्याने शहरात दहशत पसरली होती. काही दुचाकी चालकांच्या मागेही तो लागला असल्याची माहिती आहे.
आधी या पिसाळलेल्या कुत्र्याने गणेशपूर येथील एक वृद्ध महिलेला चावा घेतला होता. त्यानंतर त्याने दामले फैल, साधनकर वाडी, मंगलम पार्क, सुगम हॉस्पिटल या परिसरात सुमारे 10 ते 12 जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. यातील अनेक जण वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
गुरुवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण शहरात या पिसाळलेल्या कुत्र्याबाबत माहिती पसरली होती. अनेक लोक या कुत्र्याचा शोध घेत होते. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास पिसाळलेला कुत्रा राम शेवाळकर परिसरात पोहोचला. तिथे तो एका व्यक्तीच्या मागे चावा घेण्यासाठी धावला होता. तिथे काम करणाऱ्या काही मजुरांना निदर्शनास हे आले. काही लोकांनी हा पिसाळलेला श्वान असल्याचे सांगताच त्यांनी बांबू व फाट्याच्या साहाय्याने कुत्र्यावर वार केले. त्यातच तो ठार झाला.
दीपक टॉकीज परिसरही दहशतीत
आधीच एका पिसाळलेल्या श्वानाच्या दहशतीत शहरातील काही परिसर असताना दीपक चौपाटी परिसरातही असाच एक पिसाळलेला श्वान फिरत असल्याची माहिती आहे. या श्वानानेही अनेकांना चावा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या डोक्यावर जखम असून तो याच परिसरात फिरत आहे. त्यामुळे या श्वानाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)