ज्येष्ठ रंगकर्मी गणपतराव अतकारे यांचा वणीत गौरव

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नव्या पिढीने जपला जुन्या रंगभूमीचा सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना ज्या ज्येष्ठ कलावंतांनी रंगभूमीची अविरत सेवा केली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ‘सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणी’च्या वतीने ज्येष्ठ नाट्यकलावंत गणपतराव अतकारे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

​कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सागर मुने तसेच स्थानिक ज्येष्ठ आणि बालनाट्य कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी अतकारे यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा गौरव करण्यात आला. सत्कार प्रसंगी जुन्या काळातील नाटकांच्या आठवणी तत्कालीन रंगभूमीची आव्हाने आणि रंगकर्मींचा संघर्ष यावर चर्चा होऊन जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.

​केवळ औपचारिकता न ठेवता थेट ज्येष्ठ कलावंतांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव करण्याच्या या उपक्रमामुळे उपस्थित बालनाट्य कलावंतांना थेट ज्येष्ठांचे मार्गदर्शन व कलेचे संस्कार मिळाले. जुन्या आणि नव्या पिढीचा हा मिलाफ घडवून आणणारा सागर झेप बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम वणीच्या सांस्कृतिक वर्तुळात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Comments are closed.