मज-याजवळ ट्रक फसल्याने वणी-नांदेपेरा रोडवर वाहतूक खोळंबली

ओव्हरलोड वाहतुकीमुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रक फसल्याने वणी नांदेपेरा रोडवर बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी पर्यंत वाहतूक चांगलीच खोळंबली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा होत्या. सकाळी एक लेन सुरू करण्यात आल्याने काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र वाहतूक खोळंबल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच कामासाठी वणीला येणा-या वाहतूकदारांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.  

सविस्तर वृत्त असे की वणी ते नांदेपेरा या मार्गावरून वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून निघणा-या कोळशाची वाहतूक सुरु असते. बुधवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेपेरा ते मजरा दरम्यान रात्री एक कोळसा भरलेला ट्रक रस्याच्या बाजूला काळ्या मातीत फसला. त्यामुळे रात्रीपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या रांगा लागल्या. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणा-यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

सकाळी फसलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न सुरू होता. वाहतुकीचा खोळंबू नये म्हणून एका बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र हा सिंगल लेन मार्ग असल्याने त्याचा वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावर कायमच चिखलात ट्रक फसण्याचे किंवा बंद पडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या मार्गावर कायमच वाहतुक खोळंबण्याची समस्या असते.

या मार्गाची क्षमता ही 8 टन आहे. मात्र या मार्गावरून कायमच कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा गावकरी आरोप करीत आहे. याबाबत या मार्गावरील गावक-यांनी आंदोलन देखील केले. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक अपघात देखील झाले असा आरोप गावक-यांचा आहे. तसेच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळशाची अवैधरित्या वाहतूक होते असा देखील गावक-यांचा आरोप आहे.

रस्ता खराब असल्याने ट्रॅफिक जामची समस्या – संजय आत्राम
एका बाजूने वाहतूक सुरु आहे. सदर मार्ग सिंगल रोड असून रस्त्याची अवस्था दयनीय आहे. कोळसा वाहतूक करणारे वाहन परवानगी क्षमतेनुसार वाहतूक करीत आहे. मात्र रस्त्याची भारवाहन क्षमता 10 टनची असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. रस्ता खराब असल्याने या मार्गावर काही वेळा वाहतूक खोळंबते.
– संजय आत्राम : सपोनि वाहतूक शाखा वणी

Comments are closed.