शहरात उडतोय वाहतुकीचा बोजवारा, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
विवेक तोटेवार, वणी: वाहतूक विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वणी शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. अनेक अवजड वाहने भर दिवसा बेकादेशीररित्या शहरात प्रवेश घेत आहे. तसेच अतिक्रमण, ठिकठिकाणी ऑटोचालकांचा ठिय्या, रस्त्यावर टाकलेले बांधकाम साहित्य इ. मुळे शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना गेल्या काही दिवसांपासून करावा लागत आहे.
शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून वणीत वाहतूक उपजिल्हा शाखा स्थापण्यात आली. परंतु ही वाहतूक शाखा शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून गावाबाहेर दंड वसलण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. शहरात सकाळी ते संध्याकाळ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या काळात वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. परंतु अवजड वाहने टोल नाका वाचविण्याच्या नादात सरळ गावातून वाहतूक करतात. ज्यामुळे गावात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होते.
शहरात वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. काही काळापासून शहरवासी या समस्येला तोंड देत आहे. वाहतूक विभागाच्या हाकेच्या अंतरावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. मात्र कोणत्याही प्रमुख चौकात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी दिसून येत नाही. तर शहरात दिवसा येणा-या अवजड वाहनांवर वाहतूक शाखा मात्र कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका
बाजाराच्या निमित्ताने, कार्यालयीन कामासाठी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक वणीत येतात. यात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, मजूर, नोकरदार इत्यादींचा समावेश आहे. एकीकडे राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. तर दुसरीकडे मात्र गरीब लोकांकडून दंड वसूलण्याचे कर्तव वाहतूक शाखा बजावीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणा-या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात ठिकठिकाणी ऑटो चालकांचे ठिय्ये आहेत. काही ऑटोचालक बेजबाबदारपणे त्यांचे वाहन रस्त्याच्या मधोमध लावताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अनेक ठिकांनी बांधकाम सुरू असल्याने बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच टाकलेले असते. यामुळे ये-जा करणा-यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत आहे. शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने या गंभीर प्रकाराकडे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व वाहतूक विभागाने लक्ष घालावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.
Comments are closed.