मारेगाव: पर्यावर्णाचं संतुलन बिघडत चाललं आहे. ते संतुलित राहावं यासाठी वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवला जातो. विविध प्रशासकीय कार्यालय तसेच राजकारणीही हे राबवत आले आहेत. मात्र हा कार्यक्रम केवळ फोटो काढून चमकोगिरी करण्यापुरताच मर्यादित असल्याचं समोर येत आहे. वृक्षारोपण करण्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करताना हौसे नवसे गवसे दिसत आहेत. मात्र गेल्या दोन तीन वर्षांमध्ये लावलेले झाडं किती मोठे झालेत याचं त्यांना सोयरंसुतक देखील नाही.
मारेगावात मागील वर्षी नगरपंचायत प्रांगण, तहसिल कार्यालय, स्मशानभूमी आदी ठिकाणी तसेच मारेगावात प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करुन अनेकांनी आपले फोटो वर्तमानपत्र, सोशल मिडिया आदी माध्यमातून प्रसार करून प्रसिद्धी करुन घेतली. मात्र ते लावलेली झाडे कुठे गेली हे कोणालच माहीत नाही. या वर्षी सुध्दा सरकारी खर्चाने वृक्षलागवड करण्यासाठी मारेगावात खड्डे खोदण्याचे काम झपाट्याने सुरु आहे.
येत्या एक जुलैला त्या खड्यात वृक्षारोपण होणार आहे वृक्षारोपण दिनाच्या निमित्य शहरात तसेच तालुक्यात रोपटे लावले जाते. ज्याप्रमाणे झाडे लावले जातात त्याच प्रमाणात झाडे जगविण्याची ही जबाबदारी घेतली जात नाही. त्यामुळे दरवर्षी शासनाच्या निधीला चुना लागल्या जातो. शासन मान्यते नुसार झाडे लावा हा कार्यक्रम होणार हे जरी खर असले तरी दरवर्षी होणारा वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाडे लावण्या पुरताच होत असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.
जर झाडे लावण्याचा कार्यक्रम मनावर घेऊन केला आणि प्रत्येक कार्यालयाला वृक्ष लागवड झाल्यावर वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली तरच हा कार्यक्रम सार्थकी लागेल, अन्यथा दरवर्षी होणारे वृक्षारोपण कार्यक्रम केवळ चमकोगिरी करण्याचा कार्यक्रम ठरेल असे वृक्षप्रेमी व नगरिककडून बोलले जात आहे.