विवेक तोटेवार, वणी: नुकत्याच जन्मलेल्या भाच्याला बघायला गेलेला मामा दुचाकीने परतत असताना त्याच्या दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश हरिश्चंद्र बदकी (29) रा. मारेगाव असे मृताचे नाव आहे. बुधवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील संविधान चौकात हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून वणी पोलीस ठाण्यात सरेंडर झाला. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत गणेश हरिश्चंद्र बदकी (29) रा. वार्ड क्र. 2 मारेगाव येथील रहिवासी होता. तो शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. गणेश याच्या बहिणीला मुलगा झाला. त्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी गणेश हा त्याच्या भाच्याला बघण्यासाठी त्याची बजाज पल्सर या दुचाकीने (MH 29 AB 1563) ने चंद्रपूर येथे गेला होता. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी तो दुचाकीने चंद्रपूरहून मारेगाव येथे परत जात होता. दरम्यान एक ट्रक क्रमांक CG04 PH 0520 हा नागपूरहून निलजई येथे जात होता.
गुंजच्या मारोती जवळील संविधान चौकात गणेशच्या दुचाकीला भरधाव ट्रकचे मागून धडक दिली. गणेश दुचाकीसह खाली पडला. गणेश हा हेल्मेट घालून प्रवास करीत होता. मात्र त्याच्या पोटावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्याच्या पोटाचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी ऍम्बुलन्स बोलावली. गणेशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. गणेश याच्या पश्चात आई वडिल, बहिण असा आप्त परिवार आहे.
ट्रकचालक पोलीस ठाण्यात सरेंडर
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. अपघात होताच घटनास्थळी गर्दी गोळा झाली. त्यामुळे ट्रकचालक विजय सवाई राठोड हा घाबरला. त्याने तात्काळ ट्रक घेऊन पोलीस ठाणे गाठले व तो सरेंडर झाला. पोलिसांनी कलम 281,106 (1) नुसार चालक विजय सवाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोहेकों गजानन होडगिर करीत आहे.
Comments are closed.