जितेंद्र कोठारी, वणी : शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दोन इसमाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक किरकोळ जखमी झाला. झरी तालुक्यातील मुदाटी व राजणी गाव शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. गजानन पोचीराम टेकाम (40) रा. मुदाटी व निमदेश कवडू आत्राम (35) रा. राजणी ता. झरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
झरीजामणी तहसीलदार गिरीश जोशी यांनी वणी बहुगुणीला दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळीपासून वातावरण सामान्य असल्याने शेतकरी वर्ग शेत मशागती व पेरणीच्या कामात व्यस्त होते. दरम्यान दुपारी 2 वाजता सुमारास वादळीवारा व विजेच्या कडाक्यासह अनेक गावात पाऊस पडला. त्याच वेळी मुदाटी गावातील गजानन पोचीराम टेकाम (40) व मारोती सूर्यभान टेकाम (45) शेतात काम करीत असताना त्या दोघांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात गजानन हा जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार मारोती टेकाम किरकोळ जखमी झाला. जखमीला उपचारासाठी पांढरकवडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत तालुक्यातील राजणी गावात शेतात काम करीत असताना निमदेश कवडू आत्राम (35) याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर दोन्ही घटनेबाबत माहिती मिळताच पाटण पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे तयार केले. महसूल अधिकाऱ्यांनी मुदाटी व राजणी येथे जाऊन परिस्थिती पाहणी केली. या दुर्घटनेत मृत दोन्ही युवकाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.