पावसाचे तांडव: नदीच्या पुरात प्रवाहात दोघे गेले वाहून

मालवाहक पुलावरून काढतानाची घटना, एकाला वाचवण्यात यश तर दुस-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उमरी येथे राहणारे दोघे जण विदर्भ नदीच्या प्रवाहात वाहून गेले. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यातील एकाला वाचवण्यात यश आले. मात्र एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. रामा कनाके (55) असे मृताचे नाव आहे. पहाटे 3 वाजेपर्यंत बचाव कार्य सुरु होते. मंगळवारी दुपारनंतर रात्री पर्यंत पावसाचा तांडव सुरु होता. यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान विविध नुकसानीच्या घटना समोर येत आहे. वेगाव येथे एका म्हशीवर वीज कोसळल्याने यात म्हशीचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, रामा कनाके (55) रा. उमरी यांच्याकडे टाटा मॅजिक हे मालवाहक होते. मंगळवारी दिनांक 27 मे रोजी रामा व गावातील भास्कर कुसाम (50) हे काही कामानिमित्त टाटा मॅजिक वाहनाने झरी तालुक्यातील डोंगरगाव येथे गेले होते. काम आटोपून ते दोघेही रात्री 10 वाजताच्या सुमारास आपल्या गावाला परत जात होते. मंगळवारी दिवसभर पाऊस झाला. त्यामुळे पावसाने कायर-पठारपूर मार्गावरील कोसारा घाट येथे विदर्भा नदी पुलावरून पाणी जात होते. त्यांनी वाहन पुलावरून टाकले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या प्रवाहात वाहन वाहून गेले.

घटनास्थळी गावकरी उपस्थित
दरम्यान यावेळी नदीला पूर आल्याने अनेक लोक नदी पात्राजवळ उभे होते. दोघे जण वाहून जाताच गावातील काही लोक व चेतन उलमाले हा तरुण या दोघांना बाहेर काढण्यासाठी नदीत उतरले. पोलिसांच्या मदतीने भास्कर कुसाम याला वाचवण्यात आले. मात्र त्याचा साथीदार व वाहनचालक रामा मात्र नदीच्या पाण्यात वाहून गेला. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा शोध सुरु होता. अखेर पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह नदीतून काढण्यात आला. रामा हा वाहन चालवत असल्याने त्याला उतरण्याची संधी मिळाली नाही, तर भास्कर यांनी तातडीने गाडी बाहेर उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला, अशी माहिती घटनास्थळावर उपस्थिताने दिली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. 

मंगळवारी पावसाने वणी उपविभाला झोडपले
मंगळवारी दुपार 3 नंतर परिसरात वादळीवा-यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. अनेक शेतकरी शेतमजूर नाल्याला पूर आल्याने अडकले. रात्री उशिरा नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्यामुळे विदर्भा नदीला पूर आला. वेगाव येथे अरुण टोंगे यांची म्हैस जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात उभी होती. या ठिकाणी म्हशीवर वीज कोसळली. यात तिचा मृत्यू झाला. यात टोंगे यांचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे.

रामा याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.