वणीत सोमवारी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

स. 11 वा. शासकीय मैदानावर जाहीर सभा, संजय देरकर यांनी दिला 'बटेंगे नही, जितेंगे'चा नारा...

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी वणीत तोफ धडाडणार आहे. वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात स. 11 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे सुनील कातकडे, काँग्रेसचे राजीव कासावार यांच्यासह महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

खा. संजय देशमुख व खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात संजय देरकर यांचा प्रचार सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची सभा जाहीर होताच शहरासह, ग्रामीण भागातील सर्व शिवसैनिकांमध्ये व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. झरी तालुक्यात वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. मारेगाव तालुक्यात शिवसेनेसह काँग्रेसचे कार्यकर्ते संजय देरकर यांच्या प्रचारार्थ कामाला लागले आहेत. वणी शहरात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या संजय देरकर यांचा जोमाने प्रचार करीत आहे.

संजय देरकर यांनी दिला ‘बटेंगे नही, जितेंगे’चा नारा
संजय देरकर यांना तिकीट जाहीर होताच विखुरलेले शिवसैनिक एकत्र आले आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते संजय देरकर यांच्या प्रचारार्थ एकत्र आले आहे. माकप व संभाजी ब्रिगेडने देखील संजय देरकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. हे तळागाळातील सर्व कार्यकर्ते संजय देरकर यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढीत आहे. सर्व सहकारी पक्ष, समर्थक यांनी एकत्र राहून ही लढाई जिंकूया, असे आवाहन संजय देरकर यांनी केले आहे.

Comments are closed.