उकणी येथील प्रकल्पग्रस्त करणार जलसमाधी आंदोलन

600 एकर जमिनीचे हस्तांतरण अद्यापही बाकी.... प्रकल्पग्रस्त आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उकणी येथील खंड क्रमांक एकमधील उर्वरित 600 एकर जमीन तत्काळ संपादित करून भूधारकांना मोबदला व नोकरी देण्यात यावी, कोणत्याही अटी-शर्ती न लावता तत्काळ जमीन संपादित करण्यात यावी, ही प्रमुख मागणी घेऊन येत्या 9 जून रोजी उकणी गावालगतच्या वर्धा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश विठ्ठलराव ढपकस यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

काय आहे हा विषय ?
वणी परिसरातील निलजई ओपन कास्ट या कोळसा खाणीसाठी सन १९९० मध्ये वेकोलिने एक हजार २०० एकर जमीन संपादित केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये ६०० एकर जमीन संपादित करण्यात आली. तसेच उकणी ओपनकास्ट माइन्ससाठी १९९३ मध्ये एक हजार एकर तसेच २०१५ मध्ये ५५० एकर जमीन संपादित केली. ही सर्व जमीन उकणी भौगोलिक क्षेत्राअंतर्गत येत होती. त्यामुळे उकणी गावातील भौगोलिक क्षेत्राअंतर्गत निलजई व उकणी या दोन्ही खाणींसाठी ८५ टक्के जमीन संपादित केली. केवळ उकणी गावातील खंड क्रमांक एकमधील १७५ शेतकऱ्यांची ६०० एकर जमीन संपादित करण्यात आली नाही.

उकणी गावाचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. या गावाचे पुनर्वसन झाल्यास ही ६०० एकर जमीन संबंधित शेतकऱ्यांना सोडावी लागणार आहे. निलजई ओपन कास्ट खाणीच्या विस्तारीकरणासाठी जी जमीन संपादित करण्यात आली, त्या जमिनीवर मोठमोठे मातीचे उंच ढिगारे नियमबाह्यरीत्या उभे करण्यात आले. या उंच ढिगाऱ्यांमुळे त्यावरील पाणी उर्वरित शेतजमिनीवर जमा होऊन जमिनीचा पोत खराब झाला आहे. या जमिनीच्या भूपृष्ठावर मोठ्या प्रमाणावर क्षार जमा झाले आहेत. परिणामी उत्पादनात ८० टक्के घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष अमोल पुरडकर, उपाध्यक्ष पराग तुराणकर, सचिव सचिन जुनारकर, आंदोलनाचे मार्गदर्शक संजय खाडे, सहसचिव सचिन लोढे, कोषाध्यक्ष मनोज खाडे व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.