बहुगुणी डेस्क, वणी: पती स्वत: बेरोजगार होता. मात्र तो पत्नीला घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकायचा. तू आवडत नाही असे म्हणत तो पत्नीला मारहाण करायचा. या छळाला सासू, सासरे व ननंद हे सहकार्य करीत असे. हुंड्यासाठी होणा-या सततच्या मानसिक व शारीरिक छळामुळे पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी दोन्ही पक्षात कोणताही समेट न झाल्याने अखेर गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता (27) ही मुळची वणीतील तेली फैल येथील रहिवासी आहे. तिचा डिसेंबर 2022 मध्ये तुकुम जि. चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या एक तरुणासोबत (29) रितिरिवाजा प्रमाणे लग्न झाले. त्यानंतर पीडितेला एक महिना सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र नंतर सासरच्या मंडळीच्या स्वभावात फरक पडला. पती पीडितेला तू आवडत नाही असे म्हणत शिविगाळ करायचा. तर सासू सासरे देखील घरचे काम करीत नाही असा आरोप करीत सूनेशी वाद घालायचे. लग्नात हुंडा दिला नाही म्हणत पीडितेला मानसिक त्रास द्यायचे.
पीडितेचा पती हा बेरोजगार असल्याने तो पत्नीला तिच्या आई व भावाकडून घरखर्चासाठी पैसे आणण्यासाठी तगादा लावायचा. सप्टेंबर 2023 मध्ये तो पत्नीला घेऊन पुणे येथील त्याच्या बहिणीकडे गेला. तिथे तो ट्यूशन क्लास करीत होता. पुण्यातील ननंदचेच्या घरी पीडितेची ननंद तिला नोकरासारखी वागणूक देत होती. ती तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेत. तसेच पीडितेच्या पतीला भडकवून पीडितेला मारहाण करण्यास सांगायची. तीन महिन्याआधी डिसेंबर महिन्यात पुण्याला पीडितेच्या पतीने व ननंदने पीडितेशी वाद घालत तिला मारहाण केली.
त्यानंतर काही दिवसांनी पती पत्नी दोघेही चंद्रपूर येथे परत आले. त्याच्या चार दिवसांनी तिच्या पतीने तिला वणीला माहेरी आणून सोडले. दरम्यान आज ना उद्या पती नांदवायला घरी घेऊन जाईल, या आशेत पीडिता होती. मात्र तिचा पती आलाच नाही. पत्नी याबाबत पतीला विचारणा करण्यासाठी कॉल करायची, तर पतीने पत्नीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. अखेर पतीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पत्नीने वणी पोलीस ठाणे गाठत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. सदर प्रकरण पांढरकवडा येथील महिला समेट कक्ष येथे गेले.
तिथे सासरच्या मंडळींनी पत्नीला नांदवण्यास नकार दिला. तसेच पत्नीची चांगली शेकू दे असे म्हणत ते पांढरकवडा येथून निघून गेले. अखेर कोणताही समेट न घडल्याने पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पती (29), सासू (51), सासरा (55) सर्व रा. तुकुम ता. जि. चंद्रपूर व ननंद (31) रा. पुणे यांच्या विरोधात भादंविच्या कलम 498 अ व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.