वणीत पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

जितेंद्र कोठारी, वणी : मे हिटवेवचा महिना असताना मागील एका आठवड्यापासून वणी उपविभागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शनिवार एक दिवस विश्रांती नंतर रविवारी दुपारी 3 वाजता दरम्यान विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनासह पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाला. तब्बल अर्धातास पडलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

सद्य खरीप हंगामाची लगबग सुरु असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कडक उन्हात नागरणी केलेल्या शेत जमिनीतील कीटक आणि अळ्या नष्ट होतात. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. फळभाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. 

अवकाळी पावसामुळे विवाह कामातसुद्धा व्यतव्य उत्पन्न झाल्याचे पाहायला मिळाले. लग्नसराईचे दिवस असल्याने शहरातील बहुतांश मंगल कार्यालय व लॉन रविवार 7 मे रोजी लग्न सोहळ्याने गजबजलेले होते. सकाळपासून पारा चांगलाच तापत होता. मात्र दुपारी 2 वाजता पासून आकाशात ढग दाटून आले व 3.30 वाजता मेघ गर्जनांसह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वऱ्हाडी मंडळीची पळापळ झाली. 

बंगालच्या उपसागरात 8 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सिवाय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनीसुद्धा 7 ते 9 मे व त्यानंतर 17 ते 19 मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस  पडण्याचा इशारा दिला आहे

Comments are closed.