वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

वसंतमध्ये पहिल्यांदाच झरी तालुक्याला अध्यक्षपदाचा मान.... वामनराव कासावार यांच्या धक्कातंत्राने अनेकांच्या उंचावल्या भुवया....

निकेश जिलठे, वणी: नुकतिच वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जय आबड तर कार्यकारी संचालकपदी प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाबाबत वणीतील ज्येष्ठ आणि दुस-या फळीतील दिग्गज नेत्यांचे नाव चर्चेत होते. मात्र माजी आमदार वामनराव कासावार यांनी दिग्गजांना बाजूला सारत दोन तरुण नेत्यांना संधी दिली. त्यामुळे ही निवड सर्वांनाच एक धक्का होता. सोबतच गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय नसलेल्या प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांच्यावर विश्वास टाकत त्यांनी समोतोल साधला. वणी तालुक्यातून मिळालेल्या पिछाडीमुळेच तर दिग्गजांचा पत्ता तर कट झाला नसावा ? शिवाय या निवडीमागे नेमके काय गणित असावे याबाबद विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘वणी बहुगुणी’चे हे विश्लेषण…

दी वसंत जिनिंग ऍन्ड प्रेसिंग फॅक्टरी म्हणजेच वसंत नावाने परिचित असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन गट आमनेसामने आले. त्यातच आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच चुरस निर्माण झाली. एक माजी आमदार, एक विद्यमान आमदार तसेच एक विद्यमान संचालक अशा तिन्ही दिग्गजांनी आपापले पॅनल उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. त्यामुळे तिन्ही पॅनलने संपूर्ण शक्ती पणाला लावत निवडणूक लढली. मात्र आधी पिछाडीवर असलेल्या कासावार यांच्या पॅनलने अचानक अखेरच्या क्षणी आघाडी घेत दोन्ही पॅनलचा धुवाधार पराभव करत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला.  

अध्यक्षपदासाठी चुरस…
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, तसेच सहकार क्षेत्राचा अनुभव असलेले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे यांचे नाव पुढे होते. तर झरी तालुक्यातून आशिष खुलसंगे यांचे नाव ही पुढे आले. झरी तालुक्यातील मतदानाने जरी कासावार यांच्या परिवर्तन पॅलनला विजय मिळाला असला तरी या पॅनलचे दोन्ही पराभूत उमेदवार प्रकाश मॅकलवार व भूमारेड्डी बाजन्लावार हे झरी तालुक्यातील आहे. त्यामुळे झरी तालुक्यातील प्रतिनिधीला नेतृत्वाची संधी मिळावी अशी मागणी झरी तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आशिष खुलसंगे यांचे नाव अचानक समोर आले.

वणीतून कासावार यांच्या पॅनलला पिछाडी
मतमोजणीच्या पहिली फेरी ही वणी शहर व वणी तालुक्यातील होती. या फेरीत ऍड देविदास काळे यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी प्रचंड आघाडी घेतली. त्या पाठोपाठ आमदार बोदकुरवार यांच्या पॅनलचे उमेदवार होते. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत वामनराव कासावार यांच्या पॅनलच्या एकाही उमेदवारांना 1 हजार मतांचा पल्ला देखील गाठता आला नाही. वणीतून मिळालेली पिछाडीच वणी शहरातील दिग्गज नेत्यांना नेतृत्वाची संधी न मिळण्याचे एक प्रमुख कारण ठरल्याचे मानेल जात आहे.

अल्पसंख्यांक समुदायातील नेत्याला प्रतिनिधित्व
जय आबड यांना रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा अनुभव होता. शिवाय ते अल्पसंख्यांक समुदायातून येतात. व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात भाजपकडे कल आहे. वणीत लवकरच नगरपालिका निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून व्यापारी वर्गातून येणा-या जय आबड यांना उपाध्यक्षपदी संधी दिल्याचे मानले जात आहे.

तरुण नेतृत्त्वाला संधी
दुस-या फळीतील नेतृत्त्वाला पुढे येऊ दिले जात नाही असा आरोप कासावार यांच्यावर व्हायचा. शिवाय तरुण कार्यकर्त्यांकडून तरुणांना संधी दिली जात नाही याबाबत काहीसी नाराजी होती. मात्र यावेळी वामनराव कासावार दोन्ही तरुण नेत्यांना नेतृत्त्वाची संधी देत हा शिक्का पुसून काढला आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थेचा व्यवस्थापनाचा दांडगा अनुभव असणा-या प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांना कार्यकारी संचालकपदी निवड करत त्यांनी समतोल साधला आहे.

लवकरच जिल्हा परिषद सोबतच वणी नगर पालिकेची निवडणूक होणार आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकेची निवडणूक वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात लढली जाणार आहे. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही कासावार यांचे पॅनल उतरणार आहे. वसंतच्या निवडणुकीत मिळालेला विजय काँग्रेसचे मनोबल वाढवणारा तर आहेच शिवाय आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचा प्रभाव पडू शकतो. 

Comments are closed.