जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी तालुक्याच्या वतीने आज 1 मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. विराआसच्या वतीने वणी येथे महाराष्ट्र मिटाओ, विदर्भ मिलाओ आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात आणि 120 तालुक्यात जिथे-जिथे महाराष्ट्र शासन लिहले आहे तेथे-तेथे महाराष्ट्र शब्द पुसून विदर्भ शासन करण्याचे आंदोलन करण्यात आले. वणी येथील विदर्भवादी बापूजी अणे चौकातून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकर याना माल्यार्पण करून वनविभाग कार्यालय वणी येथे महाराष्ट्र शासन हे मिटवून त्या ठिकाणी विदर्भ शासन चे स्टिकर लावण्यात आले. यावेळी विदर्भावाद्यानी डोक्यावर व हातपायावर काळी फित बांधून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा निषेध केला .
28 सप्टेंबर 1953 रोजी झालेल्या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने महाराष्ट्रात सामील केले गेले व 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड अशी ओळख असलेला विदर्भ आज दारिद्री, गरीबी, कर्जबाजारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी व नक्सलवाद करिता ओळखल्या जात आहे. नागपूर करारातील 11 कलमा पैकी एकही कलम पाळल्या गेलेली नाही. म्हणून हा करार विदर्भातील जनतेला मान्य नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाला झुकते माप दिले जाईल असे वचन दिले होते. पण याउलट आजवर विदर्भाला लूटले गेले. विदर्भाच्या भूगर्भात 23 प्रकारच्या खनिज पदार्थांचा भंडार आहे. मात्र त्यावर आधारित उद्योग विदर्भात उभारण्यात आले नाही.
विदर्भात मुबलक कोळसा साठा असून येथील शेतकऱ्यांना लोडशेडींग चा सामना करावा लागत आहे. सिंचनाची सोय नसल्याने मागील 15 वर्षात तब्बल 47 हजार शेतकऱ्यांची आत्महत्येचा पर्याय निवडला. विदर्भात उद्योग नाही त्यामुळे विदर्भातून युवकांचे पालायन मोठ्या प्रमाणात होत आहे. विदर्भात मोठया प्रमाणात कापसाचे उत्पन्न होते, परंतु सुतगिरण्या व कापड कारखाने पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेला आले. आज पर्यंतच्या केंद्रातील व राज्यातील सरकारकडून विदर्भासोबत विश्वासघात करण्यात आले. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 1 मे रोजी विश्वासघात दिवस पाळून केंद्र सरकारला विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली
या आंदोलनात प्रा.पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, राजू पिंपळकर, अमित उपाध्ये, बाळासाहेब राजूरकर, विजयाताई आगबत्तलवार, देवराव धांडे, मंगेश रासेकर, संजय चिंचोळकर, दशरथ पाटील, होमदेव कनाके, अनिल गोवारदिपे, सुषमा पाटील, दिनेश रायपूरे, नीलिमा काळे, कलावती क्षीरसागर, पुंडलिक पथाडे, श्रीवल्लभ सरमोकदम यासह विदर्भवादी उपस्थित होते.
Comments are closed.