जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार, गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सावंगी (नवीन) येथे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत गावातील नागरिकांनी 12 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देऊन सावंगी (नवीन) येथे पंतप्रधान जल जीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

पंतप्रधान जल-जिवन मिशन अंतर्गत सावंगी (न.) येथे 47 लक्ष रुपयाची नळ योजना मंजुर झाली. त्या कामा करीता ठेकेदाराने गावात अस्तित्वात असलेले सिमेन्ट कॉंक्रीटचे रस्ते व्हायब्रेटरचा वापर न करता जेसीबी लाऊन काम केले. 47 लाखाच्या नळ योजनेसाठी मार्च-एप्रिल 2023 ला 60 लाख रुपये खर्च करुन तयार केलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याची नासधुस त्यांनी केली. तसेच जल-जीवन नळ योजनेत H.D.P. पाईप लाईन टाकणे गरजेचे असतांना खनिज निधीतील दोन वर्ष जुने कमकुवत झालेले पाईप टाकण्यात आले. पाइप लाइनसाठी खोदलेल्या नालीवर मुरूम टाकण्याऐवजी कंत्राटदारांनी खोदलेले मटेरियल टाकून नाली बुजविली. 

नळ योजनेत वापरलेले पाईप उनामुळे कमकुवत असल्याने जागोजागी लिकेज होऊन चिखल साचत आहे. शासनाने जनतेला पुर्ण वेळ पिण्याचे शुध्द पाणी मिळण्यासाठी जल- जीवन मिशन योजना अस्तित्वात आणली. परंतु कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठया प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे गावकरी व शासनाची फसवणुक करणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सावंगी (नवीन) येथील नागरिकांनी केली आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी निवेदन देताना पांडुरंग आसुटकर, नानाजी ढवस, एकनाथ ढवस, माधव ढवस, संतोष देरकर, विठ्ठल गानफाडे, गोकुळ ढवस, हरी बेरड, गोविंदा ढवस आणि इतर गावकरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ, कार्यकारी अभियंता जि. प. पाणीपुरवठा योजना यवतमाळ, उपविभागीय अभियंता जि.प. पाणीपुरवठा योजना वणी व माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांना देण्यात आली आहे.

Comments are closed.