बजरंग दलाने रचला सापळा, गोमांस तस्कर लागले हाती

आरोपींची पळापळ; मांसाच्या बोऱ्या टाकून पसार, 130 किलो मांस जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेरगावाहून गोमांसाची खेप वणीकडे येत असल्याची खबर लागताच बजरंग दलाचे कार्यकर्ते सतर्क झाले. पाठलाग, पाळत आणि थरारक हालचालींमध्ये आरोपींनी मांसाच्या बोऱ्या रस्त्यावर फेकत पलायनाचा प्रयत्न केला… पण अखेर पोलिसांच्या कारवाईत मोठा साठा जप्त झाला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यातील एक तस्कर तर दुचाकी घसरून पडल्याने पोलिसांच्या हाती लागला. या दोन कारवाईत तब्बल 129.5 किलो मांस व मोपेडसह 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर सदर मांस गोवंश आहे की गोमांस हे स्पष्ट होणार आहे. सदर मांस गोमांस असल्याचा दावा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून चंद्रपूर येथून वणीमध्ये गोमांस आणले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार आज 10 एप्रिलच्या पहाटे चंद्रपूरहून मांस आणले जाणार असल्याची खबर कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चंद्रपूर घुग्गुस वणी मार्गावर पाळत ठेवली. पहाटे चंद्रपूर येथून वणीतील दोघांनी मांस विकत घेतले. तसेच ते दोघे घुग्घुस मार्गे वणीला निघाले. बजरंग दलाचे कार्यकर्ते घुग्घुस रोडवर ते लालगुडा चौपाटी येथे पाळत ठेवून होते. मात्र लालगुडा चौपाटीवर सापळा रचल्याची माहिती गोवंश मांस आणणा-यांना मिळाल्याने त्यांनी व्हाया वागदरा मार्ग निवडला.

दरम्यान, सलमान शकिल शेख (वय 25) व नावेद शेख रियाज (वय 22, रा. खडबडा मोहल्ला, वणी) हे दोघे मांस घेऊन मोपेडने वागद-यामार्गे वणीकडे येत होते. गोकुळ नगर गेटजवळ कार्यकर्ते दिसताच त्यांनी दुचाकीवरील बोऱ्या रस्त्यावर फेकून युटर्न घेत पळ काढला. या बोऱ्यांमध्ये सुमारे 90.5 किलो मांस आढळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

योगायोगाने दुसरा लागला हाती
दरम्यान, सापळा रचल्याची माहिती इतर मांस आणणाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. गोकुळ नगर परिसरातील पाळत कमी झाल्याची माहिती मिळताच आरोपी अब्दूल माजिद अब्दूल सत्तार (वय 35, रा. मोमिनपूरा, वणी) हा विनानंबर मोपेडवरून मांस घेऊन वणीकडे येत होता. मात्र, समोरून पोलिसांची गाडी व कार्यकर्ते येताना दिसताच त्याने वाहन वळवून पळण्याचा प्रयत्न केला. घाईगडबडीत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरून खाली पडले. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून सुमारे 39 किलो मांस जप्त करण्यात आले.

या दोन्ही कारवाईत एकूण 129.5 किलो मांस व सुमारे 20 हजार किंमतीची मोपेड असा एकूण अंदाजे 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी बजरंग दलाचे विशाल पांडुरंग दुधबळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5, 5(सी), 9, 9(अ) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वणीत मोठ्या प्रमाणात राजूर व चंद्रपूर येथून गोमांस येत असल्याची चर्चा आहे. 

Comments are closed.