वणी येथे कोर्ट फीचा तुटवडा: पक्षकार व वकिलांना आर्थिक भुर्दंड

समस्या सोडवण्याची वकील संघाची मागणी

पुरुषोत्तम नवघरे,वणी,  दि. 20 सप्टेंबर 2025: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तहसील कार्यालयात कोर्ट फीचा तुटवडा असल्याने वकील आणि पक्षकारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वणी वकील संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात कोर्ट फी तात्काळ उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.

न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कोर्ट फीचा तुटवडा गेल्या अनेक महिन्यांपासून वणी तहसीलमध्ये कायम आहे. विशेषत: 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा अभाव आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रिया रखडत असून, पक्षकार आणि वकिलांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे. कोर्ट फी उपलब्ध नसल्याने त्यांना वणी तहसील सोडून मारेगाव, चंद्रपूर, वरोरा आणि केळापूर यांसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्याची खंत वकील संघाने व्यक्त केली आहे.

वणी वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोर्ट फीशिवाय कोणतेही न्यायालयीन कामकाज शक्य नाही. या तुटवड्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळत नसून, सामान्य नागरिकांना आणि वकिलांना भटकंती करावी लागत आहे. संघाने मागणी केली आहे की, वणी तहसील कार्यालयात ताबडतोब कोर्ट फी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पक्षकारांची गैरसोय टाळता येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत निवासी नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी वकील संघाला आश्वस्त केले की, या मागणीची पूर्तता करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील. प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, कोर्ट फीचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे सांगितले.

निवेदन देताना वणी वकील संघातील ऍड. अमोल टोंगे, ऍड. दिलीप परचाके, ऍड. प्रतीक्षा शेंडे, ऍड. रामेश्वर लोणारे, ऍड. विप्लव तेलतुंबडे, ऍड. जाहिद शरीफ, ऍड. संतोष घायवट, ऍड. कुमार मोहरामपुरी, ऍड. आकाश निखाडे, ऍड. यशवंत रहाटे, ऍड. अरविंद सिडाम, ऍड. राहुल दानव, ऍड. सुशील काळे, ऍड. पूजा मत्ते, ऍड. सुषमा क्षीरसागर, ऍड. सागर नावडे इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed.