दारू भट्टीसमोर अवघ्या 50 रुपयांच्या वादातून चाकू बाहेर !

ब्राह्मणी फाट्याजवळ थरार..... पानठेला चालकाचा चाकू हल्ल्या

बहुगुणी डेस्क, वणी: अवघ्या 50 रुपयांच्या वादातून देशी भट्टीवर काम करणा-या एकावर चाकूने हल्ला करण्यात आला. ब्राम्हणी फाट्याजवळील देशी दारू भट्टीसमोर मंगळवारी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी राहुल केशवराव नागतुरे (वय 40) हा काजीपुरा वार्ड क्रमांक 11 येथील रहिवासी आहे. तो मागील चार वर्षांपासून ब्राह्मणी फाट्याजवळील एका  देशी दारू भट्टीवर काम करतो. फाट्यावरच आरोपी यश मोरेश्वर डाखरे (वय 23, रा. जैन लेआऊट, वणी) याच पानठेला आहे. मंगळवारी (दि. 16 जानेवारी 2026) रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास राहुल हा दारू भट्टीसमोर उभे होता. तेव्हा तिथे आरोपी यश डाखरे आला.

यश डाखरे याने जवळच असलेल्या एका इसमाकडून 50 रुपये मागून देण्यास सांगितले. त्यावेळी नागतुरे याने थोडा वेळ थांबण्यास सांगितले, मात्र यश डाखरे हा शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेला. मात्र, अवघ्या 10 मिनिटांतच तो चाकू हातात घेऊन परत आला आणि नागतुरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागतुरे यांनी त्याचा प्रतिकार केला. आरोपीने पुन्हा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केल्याने नागतुरे यांनी चाकू पकडला. मात्र आरोपीने चाकू हिसकावून घेतल्याने नागतुरे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली व रक्तस्राव सुरू झाला. त्याचवेळी आरोपीचे वडील घटनास्थळी आले आणि त्याला तेथून घेऊन गेले.

यानंतर नागतुरे याने वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी यश मोरेश्वर डाखरे याच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. 

Comments are closed.