विद्युत मोटार व केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

14.73 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिन आरोपी ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी, केबल तसेच वीज खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह चौकशी केली असता तब्बल 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत 14 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वणी, पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मुकुटबन आणि पारवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेतातील पाण्याच्या मोटारी, विद्युत केबल तसेच वीज खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी सातत्याने होत होती. या वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम सुरू केली होती. 

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राळेगाव नगर परिसरातून शेख समीर, सय्यद अली आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान चोरीचा मुद्देमाल वणीतील शास्त्री नगर येथील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भंगार दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुमारे 15 लाखांचा माल जप्त
पोलिसांनी सुमारे 1,190 किलो अॅल्युमिनियम तार (किंमत 3.30 लाख रुपये), 14 किलो तांब्याची तार (किंमत 28 हजार रुपये), पाण्याच्या 2 विद्युत मोटारी (किंमत 44 हजार रुपये), 2 मालवाहू वाहने (किंमत 13 लाख रुपये) तसेच 2 वायर कटर (किंमत 1 हजार रुपये) असा एकूण 14 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वणी, पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मुकुटबन आणि पारवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments are closed.