वणीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी ताब्यात

नगर परिषद परिसरातील गल्लीत कारवाई; ₹1,410 रोख रक्कम जप्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील अवैध जुगार व्यवसायावर वणी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत नगर परिषद परिसरातील गोयल गल्लीत सुरू असलेला वरली मटका अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायं. 17:08 ते 17:30 दरम्यान वणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मटका चालवला जात असल्याची खात्री झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अतुल सुधाकर नक्षीने (वय 39, रा. रंगारीपुरा, वणी) आणि शेख फारूख शेख सलीम (वय 36, रा. पंचशील वार्ड, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक पेन, कार्बन तुकडा, वरली मटका आकडे लिहिलेलं पट्टी बुक आणि ₹1,410 रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून पैसे स्वीकारून मटका आकडे लिहित असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम 49 BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईचा पुढील तपास पोना 2363 विशाल राठोड करत असून, वणी पोलिसांची ही धडक मोहीम शहरातील अवैध धंद्यांवर लगाम लावण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांमध्येही या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.