टिळक चौकात एमडी ड्रग्सची देवाणघेवाण; पोलिसांचा सापळा यशस्वी

दोन तरुणांना अटक, ड्रग्जसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी : बुधवार, 10 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वणी शहरातील टिळक चौक परिसरात एमडी ड्रग्सची देवाणघेवाण करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अटक केलेल्यांची नावे युगांत दिनेश दुर्गे (19, रा. पंचशील नगर वणी) आणि शहाबाज सत्तार मिर्जा (35, रा. साई नगरी वणी) अशी आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, टिळक चौक येथे अमली पदार्थांची डील होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरात पाळत ठेवली आणि संधी साधून रात्री 11 वाजताच्या सुमारास एक आइसक्रीम दुकान व पान ठेल्याच्या मागे एमडी पदार्थ विक्री सुरू असताना आढळले. पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता 3.37 ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. या कारवाईत ड्रग्ज सह दोन मोबाईल व विना नंबरची बुलेट असा एकूण सव्वातीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (c), 21 (a) आणि 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रजनीकांत मडावी, सलमान शेख आणि सतीश फुके यांनी केली.

Comments are closed.