कंत्राटी कामगारांचे वेतन परत घेणाऱ्या कंत्राटदाराविरोधात मनसे आक्रमक
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेकोलीच्या (WCL) वणी नॉर्थ क्षेत्रात कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते फाल्गुन गोहोकार यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या किमान वेतन नियमांची (Central Sphere Minimum Wages) सर्रास पायमल्ली होत असून, कंत्राटदार कामगारांना धमकावून त्यांच्या पगारातील रक्कम परत घेत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. गोहोकार यांनी क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन देऊन आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, अनेक कंत्राटदार कागदोपत्री कामगारांना पूर्ण वेतन दिल्याचे दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन ठराविक रक्कम परत घेतली जाते. इतकेच नव्हे तर, “आम्हाला पूर्ण वेतन मिळाले आहे” असे दबाव टाकून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करून घेतले जात आहे. या प्रकाराला गोहोकार यांनी ‘आधुनिक गुलामगिरी’ असे संबोधले आहे.
वेकोलिचे कामगार अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच गोरगरीब कामगारांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेने आपल्या मागण्यांमध्ये शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकणे, जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, कामगारांकडून लुबाडलेली रक्कम व्याजासह परत करणे आणि कामगार अधिकारी, कंत्राटदार व मनसे प्रतिनिधींची तातडीने संयुक्त बैठक घेणे यांचा समावेश केला आहे.
फाल्गुन गोहोकार यांनी इशारा दिला आहे की, “वेकोली प्रशासनाच्या नाकाखाली कामगारांची लूट सुरू आहे. जर आठ दिवसांच्या आत दोषी कंत्राटदारांवर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल. त्यानंतर होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील.”
निवेदन देताना तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह विलन बोदाडकर, सुरज काकडे, धीरज बगवा, प्रवीण मांडवकर, सुरज लोंढे, गजानन बोन्डे, अमोल जेऊरकर इत्यादी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य महाप्रबंधक (नागपूर) आणि कामगार आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत. आता वेकोली प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Comments are closed.