संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे- माधव गायकवाड

संत रविदास महाराज जयंती उत्सवात झाले दुसरे प्रबोधन पर्व

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रविदास यांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे. रविदासांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. रविदास यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलुंवरती चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्र चर्मकार संघाने संत रविदास महाराज यांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला. रविदास म्हणजे एक मानाचे संत आहेत. ते नीट समजून घ्या, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड यांनी केले.

श्री संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र आणि संत रविदास चर्मकार सुधार मंडळाद्वारा आयोजित दुसऱ्या प्रबोधन पर्वात ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप होते. या सोहळ्याला खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मराठवाडा उपाध्यक्ष रामकिसन कांबळे, मराठवाडा संघटक गोविंद माऊली पारडीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रा.माणिक चव्हाण, हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ.प्रल्हाद वाघमारे, राज्य सचिव, संजय सोनटक्के, विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे, युवक प्रदेश अध्यक्ष अमर तांडेकर, सामाजिक कार्यकर्ते केरबाजी कसारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश लिपटे, यवतमाळ जिल्हा युवक अध्यक्ष सुबोध बांगडे, अनिल कानडे व मान्यवर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुढे बोलताना गायकवाड यांनी अनेक दाखले दिलेत. संत कबीरांनी म्हटलं की, आपण बाप जिवंत असताना काळजी घेत नाही. मेल्यावर मात्र त्यांच्या नावाने कावळ्यालाही जेऊ घालतो. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा या भारतामध्ये आहेत. आयुष्यात कधीच खचू नये. लढत राहावं. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे निंदकाचे घर असावे शेजारी. विरोधक नसतील तर मजाच येणार मजा येणार नाही.

नगरच्या अधिवेशनात संत रविदास महाराजांच्या यथायोग्य चित्रांचे १ लाख कॅलेंडर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाने वितरीत केलेत. रविदास यांचा धडा पाठ्यपुस्तकात आणला. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाला रविदास यांचे चारित्र्य प्रकाशित करायला लावले. संघटित राहणे हीच संत रविदासांची जयंती आहे. संत मीराबाई ह्या गुरु रविदास यांच्या शिष्या होत्या. संत मीराबाईंचा बालविवाह झाला होता. नंतर त्यांच्या पतीचा निधन झालं. त्या वेळी संत मीरा ही सती जात होती. तर ही गोष्ट कळल्यानंतर त्या सगळ्या व्यवस्थेचं मत परिवर्तन संत रविदासांनी केलं. मीराबाईंना सती जाण्यापासून रोखलं.

गुरु रविदास यांनी त्या काळात या देशांमध्ये सतीची चाल बंद करण्याचं फार मोठं काम केलं. माझा रविदास सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून आग्रही होते. स्त्रीला सन्मान देणारे होते. त्यांनी सतीची चाल बंद केली. स्त्रिला शिष्यत्त्व दिलं. एकूण 52 राजे आणि २५ राण्या रविदासाच्या शिष्या होत्या. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, माणसातला देव शोधला पाहिजे. सेवा करण्यामध्ये जो देव आहे, तो जगात कुठेच नाही. शिक्षण, महिलांना सन्मान आणि स्वातंत्र्याचा जयघोष संत रविदास महाराजांनी केला. ते म्हणायचे, कोणाच्याही आधीन राहू नका.

लोक विचारतात रविदासांनी काय केलं? ते आपल्याला माहीत असायला हवं. तुमचं संघटन मधमाशांच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे. चर्मकार समाजावर कुठेही अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस तुम्ही मधमाशासारखे कुठून पडलं पाहिजे. त्याचा प्रतिकार केला पाहिजे. असा संदेश गुरु रविदासांचा आहे. स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. जातीव्यवस्थेचं निर्मूलन झालं पाहिजे.

प्रास्ताविकातून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी संपूर्ण आढावा घेतला. राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. आम्ही समाजोपयोगी उपक्रम राबवतो. समाजाला प्रबोधनाची एक मेजवानी देतो. प्रबोधनासोबतच समाजातल्या तळागाळातील व्यक्तीला काय पाहिजे, त्याचा विचार करतो. त्याप्रमाणे निर्णय घेऊन आम्ही त्या पद्धतीने काम करतो.

मागील काळात आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये असलेल्या उपेक्षित घटका अंतर्गत गट आणि कामगारांना सन्मानाने साहित्याची किट दिली जाते. तसेच ऊन व पावसापासून संरक्षण करण्याकरिता छत्रीचे वाटप करीत असतो. समाजातील सर्व जेष्ठ साठ वर्षावरील व्यक्तींचासुद्धा आम्ही सन्मान करत  असतो. त्यासोबतच समाजात विविध पदांवर काम करत असताना विविध ठिकाणी विशेष कामगिरी केली. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचासुद्धा आम्ही सन्मान करत असतो. आम्ही इथपर्यंतच थांबलो नाही तर भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त आम्ही यावर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वणी शाखेने यावर्षी 1000 संविधान ग्रंथ वाटप केले. 

या प्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले की, चर्मकार समाज सर्व जाती-धर्मांच्या कोणत्याही कार्यक्रमांध्ये उत्साहाने सहभागी होणारा समाज आहे. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना घेऊन चालणारा हा समाज आहे. ते या विभागाचे खासदार तर नाहीत; तरीही समाजाच्या कार्यासाठी तत्पर आहे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की एखाद्या ऑफिसमध्ये असो एखाद्या ठिकाणी असो कोणतेही काम होत नाही. त्यावेळेस संजय देशमुखची आठवण करा. मी निश्चितपणे आपल्या समाजबांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहील.

बबनरावजी घोलप आपले नेते आहेत. मी लहानपणापासून त्यांना पाहत आहे. त्यांनीसुद्धा अतिशय संघर्षामधून आपलं वलय निर्माण केलं. गरीब आणि सामान्य माणसाला स्वतःचं वलय निर्माण करणं सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सातत्याने त्या माणसाला खूप धडपड करावी लागते. कुठेतरी आपलं अस्तित्व निर्माण करावं लागते.

वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी याप्रसंगी संवाद साधला. ते म्हणाले की, संबा वाघमारे यांची एक मागणी आहे. ती म्हणजे टिळक चौक ते शिवनेरी चौक मार्गाला संत रविदास महाराजांचे नाव देण्यात यावे. त्यानुसार आपला जो प्रण तो नक्कीच मी शासनापर्यंत आणि नगरपालिकेपर्यंत पोहोचवून या रस्त्याला या भूमीला संत रविदास महाराजांचे नाव देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करेन. ही जयंती कोण्या एका समाजाची नाही.

संत रविदास महाराज कोण्या एका समाजाचे नव्हते. कोणतेही संत जे होऊन गेले त्यांनी एकाच समाजासाठी कार्य केले नाही. सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं आहे. तो आदर्श आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. तोच आदर्श घेऊन आपल्याला या ठिकाणी आपलं काम करायचं आहे.

संबा वाघमारे या ठिकाणी समाजाच्या उत्पन्नासाठी काही कार्य करत आहेत. समाजाचं प्रबोधन करत आहेत. समाजाला उच्च कामाच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. त्यांनी केलेलं कार्य आजपर्यंत निस्वार्थपणे केलं. या समाजाचा आपल्याला देणं आहे. या समाजाचं कार्य खूप महान आहे. संत रविदास महाराज हे आदर्श आहेत. त्यांनी केलेलं काम हे आपल्याला पुढे आपल्या पिढीपर्यंत न्यायचं आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी इतिहासातील चर्मकार समाजाचे अनेक दाखले दिलेत. ते म्हणाले की, पूर्वीची व्यवस्था संतापजनक होती. माणूस माणसापासून दूर गेलेला होता. आपण इतर समाजाच्या लोकांच्या जवळ बसू शकत नव्हतो. आणि तेराव्या शतकामध्ये रविदासांनी विचार दिला समतेचा आणि बंधुत्वाचा. त्या विचारांचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही होता.

म्हणून पहिला ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासांना समर्पित केला. व्यवस्था कशी असायला पाहिजे? न्याय व्यवस्था कशी असायला पाहिजे? जाती व्यवस्था कशी असायला पाहिजे? असा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीत असताना केला. संत रविदासांचे विचार त्या घटनेमध्ये उतरवलेत. आज आपल्या समाजाला आणि मानव जातीला न्याय मिळाला. 1995 साली राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाली.

त्या माध्यमातून बबनराव घोलप यांनी समाजाचं काम हाती घेतलं. आज महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये संत रविदासांची जयंती साजरी होते. हे सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे यश आहे. चर्मकार समाजाच्या 1152 जाती व उपजाती आहेत. आपल्याला एवढा मोठा समाज एकत्र करायचा आहे. परंतु हे करत असताना समाजामध्ये अजून विचारांची कमी आहे. आपल्याला भेदभाव न मानता एकत्र यायला पाहिजे.

रक्ताच्या शेवटच्या थेंबाापर्यंत पद असो किंवा नसो समाजाचे काम करत राहा. एक छोटीशी लाट येते. समुद्राला गती देते. त्या पद्धतीने आपल्यामध्ये चांगल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. समाजकार्य केलं तर समाज डोक्यावर धरून नाचल्याशिवाय राहत नाही. आज चर्मकार समाज स्वाभिमानी आहे. हा कष्ट करेल, हमाली करेल, छोटी मोठी नोकरी करेल; पण कधी रस्त्यावर भीक मागणार नाही.

त्याला स्वाभिमानी होऊन जीवन जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्याची मीटिंग चांभारवाड्यामध्ये झाली. रायगडच्या पायथ्याशी एक चांभारगड नावाचं गाव आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण कोण करीत होते, तर ते चांभार लोक करत होते. त्यांनी शाबासकी म्हणून चांभारगड दिलं. आपला समाज लढाऊ होता. धाडसी वृत्तीने पुढे येणारा होता. जिद्दीने लढणारा होता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक आदर्श निर्माण केला गेला पाहिजे.

बबनराव घोलप यांनी अध्यक्षीय भाषणातून अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यांनी देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये फिरत असताना अनेक कार्यकर्ते भेटलेत. त्यांनी समाजाबद्दल प्रचंड आदर आहे. समाजासाठी काही करावं असं वाटतं आहे. त्यापैकी संबा वाघमारे एक आहे. त्यांच्या या कार्यकर्तुकाला शाबाशी देण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आलेलो आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन देणं, तुमचा उत्साह वाढवणं यात मला जास्त आनंद आहे. समाजाचं काम करत असताना अतिशय मेहनतीने काम करावं लागतं. समाज नाराज होणार नाही ना? आमच्याकडून दुसरं काही वेडंवाकडं तर घडणार नाही ना? अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी समाजाचा संघटन या ठिकाणी आपल्याला जपायच्या आहेत. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची निर्मिती ही समाजाला एकत्र करण्याच्या दृष्टीने झालेली आहे.

आज 1156 जाती भारतामध्ये चर्मकारांच्या आहेत. सगळ्यांचा व्यवसाय एकच आहे. सगळ्यांची नाळ जोडलेली आहे. परंतु जसे गाव बदलते भाषा बदलते. जिल्हा बदलतो तेव्हा राहणीमान बदलतं. सगळं बदलतात . त्यामुळे आपल्यामध्ये कुठेतरी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये दरी निर्माण झालेली आहे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जातीभेद बाजूला ठेवले पाहिजे. समाजाने आपली ओळख ठेवली पाहिजे.

दुसरा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ घेऊन या संघटनेमध्ये काम करत नाही. तर केवळ आमच्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. सगळे संघटित झाले पाहिजे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आले पाहिजे. समाजबांधवांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त आपला समाज कसा दिसेल, आपल्याकडे बघण्याचा गावाचा दृष्टिकोन, आपल्या तालुक्याच्या नेत्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

या सोहळ्यात गटई कामगारांना व्यवसायाची कीट व छत्र्यांचे वाटप झाले. विविध क्षेत्रांतील कतृत्त्ववानांचा सत्कार झाला. तसेच नियुक्तीपत्रांचे वाटपदेखील झाले. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र बच्चेवार यांनी केले. आभार महेश लिपटे यांनी मानले.

Comments are closed.