महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये टोळक्याचा राडा; 8 जणांविरोधात गुन्हा

गेटवरून उडी मारून रिसॉर्टमध्ये घुसले; दोघांना बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: दारूच्या नशेत रिसॉर्टमध्ये सुरू असलेला धिंगाणा… जाब विचारताच दोघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पाठलाग करून त्यातील एकाला पकडताच फोनाफोनी सुरू झाली. काही मिनिटांतच आणखी तिघे घटनास्थळी दाखल झाले आणि शिवीगाळ करत निघून गेले. मात्र काही वेळाने तब्बल 8 जणांचे टोळके पुन्हा रिसॉर्टवर धडकले. गेटवरून उडी मारत आत घुसलेल्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर प्लास्टिकची खुर्ची डोक्यात मारण्यासह काठीनेही हल्ला करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

तक्रारीनुसार, फिर्यादी सुमित रविंद्र तुराणकर (31) हे सावर्ला येथील रहिवासी असून शेतीसोबत इलेक्ट्रिकचे काम करतात. वरोरा रोडवरील नायगावजवळील महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये ते पार्टटाईम इलेक्ट्रिकचे काम करतात. शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास रिसॉर्ट समोर दोन व्यक्ती दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची माहिती सुमित यांना त्यांचा मित्र विनोद याने दिली. त्यानंतर सुमित हे विनोदसोबत रिसॉर्टमध्ये गेले. दोघे येताना दिसताच संबंधित व्यक्तींनी तेथून पळ काढला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुमित आणि विनोद यांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एक जण त्यांच्या हाती लागला. विचारपूस केली असता त्याने आपले नाव गोलू, रा. वणी असल्याचे सांगितले. त्याच्या साथीदाराला पकडल्याचे समजताच त्याच्या सहकाऱ्याने फोन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही वेळातच आणखी तिघे जण तेथे आले. त्यांनी सुमित आणि विनोद यांच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘सेटलमेंट करू’ असे सांगून ते पाचही जण तेथून निघून गेले.

मात्र काही वेळाने आणखी तिघांसह एकूण 8 जण पुन्हा रिसॉर्टमध्ये आले. त्यांनी रिसॉर्टच्या गेटवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि सुमित व विनोद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका व्यक्तीने प्लास्टिकची खुर्ची उचलून सुमित यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने काठीने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, रिसॉर्टमधील आरडाओरड ऐकून परिसरातील काही ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थ येत असल्याचे पाहून मारहाण करणारे आठही जण तेथून पळून गेले. तसेच जाताना जीवे मारण्याची धमकी देऊन गेले.

घटनेनंतर सुमित यांनी प्रथम रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर वणी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी वणी पोलिसांनी गोलू, आयान, जिहान, मोबीन, संकेत, रेहान आणि दोन अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत नमूद कलमांनुसार 352, 351(3), 351(2), 329(3), 3(5), 296, 191(3), 191(2) आणि 118(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.