बहुगुणी डेस्क, वणी: रात्री गोडावून बंद… परिसरात शांतता… मात्र सकाळी गोडावून उघडताच खाली पडलेल्या पेट्या आणि छतावरील काढलेली कौले पाहून मॅनेजरच्या पायाखालची जमीनच सरकली. पाहणी केली असता देशी दारूचे तब्बल 11 बॉक्स गायब असल्याचे समोर आले. छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि 90 एमएलच्या तब्बल 1,100 बाटल्या घेऊन पोबारा केल्याचा संशय आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नवरगाव परिसरात खळबळ उडाली आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील देशी दारूच्या गोडावूनमध्ये ही चोरी झाल्याची नोंद मारेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी विजय जगन्नाथ पोलजवार (58), रा. नवरगाव, ता. मारेगाव, जि. यवतमाळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, पोलजवार हे मागील 20 वर्षांपासून नवरगाव येथील विराणी ब्रदर्स या परवानाधारक देशी दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. 12 ऑगस्ट रोजी दुकानासाठी 90 एमएल क्षमतेच्या 110 बॉक्स आणि 180 एमएल क्षमतेचे 5 बॉक्स असा एकूण 115 बॉक्स माल गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता. पोलजवार यांच्या म्हणण्यानुसार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद करण्यापूर्वी त्यांनी गोडावूनमधील दारूच्या साठ्याची मोजणी केली होती. त्यावेळी 90 एमएल क्षमतेच्या देशी दारूचे 72 बॉक्स शिल्लक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दुसऱ्या दिवशी, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर गोडावूनमधून दारूचा माल काढण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी काही पेट्या खाली पडलेल्या दिसल्या. संशय आल्याने त्यांनी गोडावूनची पाहणी केली असता छतावरील काही कौले काढलेली आढळून आली. त्यानंतर साठ्याची तपासणी केली असता 90 एमएलच्या 100 बाटल्या असलेले 11 सिलबंद बॉक्स गायब असल्याचे समोर आले. प्रत्येक बॉक्सची किंमत 3,000 रुपये असून चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत 33,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कायमी कलम 305(a) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.


Comments are closed.