‘गाडीवर बस’ म्हणत अडवले; नकार देताच तरुणावर हल्ला

'रिपोर्ट दिलास तर संपवून टाकीन'; हल्लेखोरांची धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री उशिरा घराकडे निघालेल्या एकाला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविण्याचा प्रयत्न करत बेदम मारहाण करण्यात आली. मंगळवारी दिनांक 14 जुलै रोजी रात्री वणीतील जत्रा मैदान परिसरात ही घटना घडली. ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी मारहाण करणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी रवि राजेश घुगरे (31, रा. रामपुरा वॉर्ड, वणी) हे अकोला को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (दि. 14 जुलै) सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते रंगारीपुरा येथे बहिणीकडे जेवणासाठी गेले होते. रात्री सुमारे 10.30 वाजता ते घराकडे पायी निघाले. दरम्यान जत्रा मैदान परिसरात त्यांची आकाश (पूर्ण नाव माहित नाही, वय अंदाजे 28, रा. मैलगडा, वणी) याच्याशी भेट झाली.

तक्रारीनुसार, आकाशने फिर्यादीला मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर आकाश आणि त्याच्या एका मित्राने संताप व्यक्त करत हातातील काठीने तोंड व पायावर मारहाण केली. त्यानंतर दोघांनी बुक्क्यांनीही बेदम मारहाण केल्याने फिर्यादीच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे मित्र घटनास्थळी धावून आले आणि दोघांचे भांडण सोडविले.

त्यावेळी आकाशने, “माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला जीवे मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जखमीवर ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आकाश आणि त्याच्या अनोळखी मित्राविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.