बहुगुणी डेस्क, वणी: लग्नानंतर अवघ्या महिनाभरात संसारात मतभेद निर्माण झाले आणि त्याचे रूप कौटुंबिक छळात बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहितेला पती, सासू, सासरे, जाऊ आणि भासऱ्याकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शिवाय माहेरहून ₹5 लाख आण, नाहीतर घरात राहू नकोस, अशी मागणी करत मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (26) या सध्या वणीलगतच्या एका गावात वास्तव्यास आहे. त्यांचा विवाह मे 2026 मध्ये कायर येथील एका तरुणाशी रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचा एक महिना त्यांना चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर सासू (55), सासरे, जाऊ (28) आणि भासरा यांनी किरकोळ कारणांवरून त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
सासरचे सदस्य वारंवार पतीला पत्नीविरोधात भडकवत होते. त्यांच्या सांगण्यावरून पतीकडून मारहाण करीत होते. “तू चांगली नाहीस, तुझ्या माहेरी निघून जा,” असे म्हणत तिला वारंवार घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
दुस-याशी फोनवर का बोलते?
यानंतर 18 जून रोजी पतीने पत्नीवर संशय घेत तिच्याशी वाद घालत मारहाण केली. “तू दिसायला चांगली नाहीस, दुसऱ्यांशी फोनवर बोलतेस,” असा आरोप करत तिला घराबाहेर हाकलून दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, “माहेरहून ₹5 लाख घेऊन आलीस तरच घरात राहू देईन, अन्यथा तुला जिवे मारून टाकीन,” अशी धमकी दिली, असा आरोप तक्रारीत आहे. त्यानंतर पतीने फिर्यादीच्या वडिलांना बोलावून मुलीला सोबत घेऊन जाण्यास सांगितल्याने ती माहेरी परतली. तेव्हापासून ती वडिलांकडेच राहत आहे.
या प्रकरणात महिला समुपदेशन केंद्र, पांढरकवडा येथे समेटाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो निष्फळ ठरला. अखेर पत्नीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पती, सासू, सासरे, जाऊ आणि भासरा अशा पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


Comments are closed.