दरोड्यातील फरार आरोपी जेरबंद; धारदार शस्त्रांसह तरुण ताब्यात

एलसीबीची दुहेरी कारवाई, शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा धडक मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगे बाबा चौकातील ज्वेलरी व्यवसायी कोंडावार यांच्या घरी 30 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या धाडसी दरोड्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, याच मोहिमेदरम्यान वणी शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आले. या दुहेरी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Birthday

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री नाईट पेट्रोलिंगदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि वणी उपविभागीय पथकाने माळीपुरा येथील निलेश उर्फ अनिकेत कुमेश सोनटक्के (22) याच्या घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान तलवारी, चाकू व कुकरी अशी एकूण 6 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. जप्त शस्त्रांची अंदाजे किंमत सुमारे 14,000 रुपये असून, ही शस्त्रे अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी आर्म्स ॲक्ट कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फरार आरोपीस अटक
30 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजता संत गाडगे बाबा चौकात ज्वेलरी व्यावसायिक संजय कोंडावार यांच्या घरी 5 ते 6 शस्त्रधारी दरोडेखोरांनी धाड टाकून 12.85 लाखांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लुटली होती. या गुन्ह्यातील मास्टरमाईंडसह तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र अनिकेत उर्फ बांडी प्रकाश एगडवार (23, रा. यवतमाळ) हा आरोपी दोन महिन्यांपासून फरार होता. एलसीबीने गोपनीय माहितीच्या आधारे त्याला यवतमाळ येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी दत्ता पेंडकर व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Comments are closed.