पुरुषोत्तम नवघरे, वणी: जागतिक महिला दिनानिमित्त सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने महादेव मंदिर, सुतारपुरा येथे मंगळवार, दि. 10 मार्च 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मार्गदर्शनपर व्याख्यान, महिलांचा सत्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या महिला अध्यक्ष वंदना आवारी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य क्षेत्रीय अधिकारी (TDRF) मुस्कान सैय्यद उपस्थित होत्या. वैद्य सुवर्णा चरपे यांनी “स्वयंप्रतिकारक रोगाशी लढताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देऊन महिलांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी गट ग्रामपंचायत सदस्य माथोली व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रतीक्षा देऊळकर, नगरसेविका आरती वांढरे व अर्चना झिलपे तसेच समाजातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला. दुपारी 2 वाजता व्याख्यान व सत्कार समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत “मम्मी स्पेशल” नृत्य व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी एकल नृत्य, सामूहिक नृत्य व नाटिका सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता लांडे यांनी केले.
सुतार समाज महिला मंचाच्या अध्यक्षा मंगलाताई झिलपे, उपाध्यक्ष शारदा झिलपे, सचिव जयश्री अंड्रस्कर, कोषाध्यक्ष संगीता मुरस्कर, कार्याध्यक्ष संगीता झिलपे, सहसचिव पुष्पा वनकर यांच्यासह मंचाच्या सदस्यांनी तसेच समाजातील अनेक महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.




Comments are closed.