महिला दिनानिमित्त तेजस्विनी गव्हाणेचा पोलीस मुख्यालयात सन्मान
साहसिक खेळांची युवा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणेचा गौरव
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुक्यातील साहसिक खेळांची युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे हिचा महिला दिनानिमित्त यवतमाळ पोलिस मुख्यालयात सन्मान करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. तेजस्विनी ही नगरसेविका मनिषा गव्हाणे व सामाजिक कार्यकर्ते राजू गव्हाणे यांची कन्या असून अल्पवयातच तिने साहसिक खेळांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तलवार-दांडपट्टा, भाला, बाणा आणि लाठीकाठी यांसारख्या पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देत ती तरुण पिढीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करीत आहे.
लहानपणापासूनच साहसिक खेळांची आवड असलेल्या तेजस्विनीने अवघ्या सातव्या वर्षी आजोबा वस्ताद देवरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी व तलवारबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील सुप्रसिद्ध वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाड्यात तिने पुढील प्रशिक्षण घेतले.
स्वतःचे कौशल्य विकसित करताना तिने स्वतःचा चमू तयार करून मुला-मुलींना पारंपरिक साहसिक खेळांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होत असून मर्दानी खेळांची परंपरा जपली जात आहे. याशिवाय तेजस्विनी कराटे या खेळात ब्लॅक बेल्टधारक असून वकृत्व, विविध कला आणि सामाजिक उपक्रमांमध्येही ती सक्रिय आहे. तिच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.




Comments are closed.