विवेक तोटेवार, वणी: शहरात चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तलाव रोड परिसरात घडलेली घरफोडीच्या प्रयत्नाची घटना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही मोठी आर्थिक हानी झाली नसली तरी आरोपींचा बेत उधळला गेला नसता तर मोठी चोरी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील वार्ड क्र. 13, तलाव रोड परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक पांडुरंग ताटेवार (वय 53), व्यवसाय सायकल दुकान, रा. योगिराज नगर, ता. वणी, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. दिनांक 27/02/2026 रोजी सायंकाळी सुमारे 19:30 वाजताच्या सुमारास वार्ड क्र. 13, तलाव रोड येथे आरोपी 1) जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक (वय 45, रा. दुर्गापुर, ता. जि. चंद्रपूर) व 2) दिपक गणपत येरेकर (वय 36, रा. दुर्गापुर, ता. जि. चंद्रपूर) यांनी फिर्यादी यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप व कोंडा फोडून घरात प्रवेश केला.
घरफोडीचा प्रयत्न करून चोरी करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणताही ऐवज चोरीस गेला नाही. पोलिस नोंदीनुसार ‘गेलेला माल – निल’ तसेच ‘मिळालेला माल – निरंक’ अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4), 305(a), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल HC/2189 मारोती पाटील करीत आहेत. शहरात वाढत्या घरफोडीच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Comments are closed.