अखेर वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांची बदली

गोहत्या प्रकरण भोवले? 'यांच्या'कडे ठाणेदारांकडे प्रभार

विवेक तोटेवार, वणी: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले ठाणेदार पीआय अनिल बेहराणी यांची यवतमाळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पुसद ग्रामीणचे ठाणेदार पीआय गोपाळ उंबरकर यांच्याकडे वणी पोलीस ठाण्याचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. त्यांच्या बदलीमुळे गोहत्या प्रकरण भोवल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याविरोधात रामनवमी समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांनी रणशिंग फुंकले होते. ठिकठिकाणी सुरू असलेला मटका, रेती तस्करी, कोळसा चोरी, भंगार चोरी, ड्रग्ज विक्री, अवैध दारू विक्री याने शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले होते. दरम्यान वणीतील गोहत्या प्रकरणाने संपूर्ण शहर ढवळून निघाले. रवि बेलुरकर यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी थेट यवतमाळ गाठत जिल्हा पोलीस अधिक्षक यांची ठाणेदारांच्या बदलीसाठी भेट घेतली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. अखेर त्याआधीच त्यांची बदली झाली. दरम्यान काही राजकीय नेत्यांनी बदली होऊ नये यासाठी फिल्डिंग लावली होती. अशी माहिती रवि बेलूरकर यांनी दिली.  त्यांच्या अवघ्या 11 महिन्याच्या कालावधीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू असले तरी, गोहत्या प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडल्याचे बोलले जात आहे. 

कोण मारणार बाजी?
वणी पोलीस ठाणे याची ओळख मलईदार ठाणे म्हणून आहे. त्यामुळे सर्वच या ठाण्यासाठी इच्छुक असतात. बेहराणी यांची बदली होताच इच्छुकांनी फिल्डिंग देखील लावायला सुरूवात केल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पुसद ग्रामीणचे ठाणेदार गोपाळ उंबरकर यांना वणी ठाण्याचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे.

Comments are closed.